मुंबई :
होळीसाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळाने १६ ते २७ मार्चदरम्यान १०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एसटी संपाचा गैरफायदा घेऊन प्रवाशांची लूट करणार्या खासगी वाहनांवर परिवहन आयुक्तांनी तातडीने कारवाई करावी, असे आदेश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिले.
होळी हा कोकणातील मोठा सण असून, यावेळी गावागावांमध्ये पालख्या फिरत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात गावी जातात. मात्र अद्यापही काही ठिकाणी एसटी महामंडळाचा संप सुरू असल्याने खासगी बसेसकडून प्रवाशांची अडवणूक करुन जादा दर आकारण्यात येत आहे, अशा स्वरुपाच्या आलेल्या तक्रारींची दखल घेत तातडीने तपास पथक नेमून कारवाई करण्यात यावी, असे आदेश परिवहन मंत्री परब यांनी परिवहन आयुक्त यांनी दिले.
या आगारातून सुटणार गाड्या
मुंबई सेंट्रल, कुर्ला, परळ, बोरिवली, वसई, ठाणे, नालासोपारा तसेच पनवेल जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जादा बसेस सोडण्यासाठी सातारा, पुणे, सांगली जिल्ह्यातून जादा बसेस मागवण्यात आल्या आहेत.