मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात लसीकरण महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र अद्यापही अनेक नागरिकांच्या मनात शंका आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी १०० टक्के पूर्ण लसीकरण झालेल्या सोसायट्यांवर पोस्टर लावण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मुंबईतील तब्बल १० हजार सोसायट्यांमधील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण केल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईतील ९७ टक्के नागरिकांना लसीचा पहिला तर ५८ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. नागरिकांमध्ये लसीकरणाचे महत्व वाढावे म्हणून ज्या सोसायटीमधील १०० टक्के रहिवाशांनी लस घेतली आहे. अशा सोसायट्यांवर १०० टक्के लसीकरण झाल्याचे पोस्टर पालिकेकडून लावले जात आहेत. मुंबईत सुमारे ३७ हजार सोसायट्या असून त्यापैकी २२ हजार सोसायट्या नोंदणीकृत आहेत. त्यापैकी १० हजार सोसायटीमधील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.
डिसेंबरदरम्यान रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता
कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले असल्याने गणेशोत्सव, नवरात्री या उत्सवांवेळी नागरिकांनी बाजारांमध्ये गर्दी केली. मात्र यावेळी रुग्णसंख्या वाढलेली नसली तरी दिवाळी, ख्रिसमसच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना नियमाचे पालन न केल्यास डिसेंबरदरम्यान रुग्णसंख्या वाढण्याची शक्यताही काकाणी यांनी व्यक्त केली.