नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या किसान रेल्वे गाडीच्या एक हजाराव्या फेरीला गुरुवारी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर, केंद्रीय रेल्वे, दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला. महाराष्ट्रातील सावदा येथून निघालेली ही किसान रेल्वेगाडी दिल्लीतील आदर्श नगर येथे पोहोचणार आहे.
आपला देश कृषी प्रधान असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी फळे आणि भाज्या या नाशिवंत शेतमालाला उत्तम भाव मिळण्यासाठी किसान गाड्यांच्या माध्यमातून किफायतशीर दरात दूर अंतरावरील बाजारात पोहोचवले जावे यासाठी किसान रेल्वेगाडी हा उपक्रम सुरू केला आहे. किसान रेल्वेगाडीच्या पहिल्या आणि शंभराव्या फेरीला पंतप्रधानांनी हिरवा कंदील दाखवला होता. त्या दोन्ही प्रसंगी मी उपस्थित होतो. त्यामुळेच मध्य रेल्वेच्या हजाराव्या किसान गाडीला रवाना करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मला आनंद होत असल्याचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर म्हणाले.
जळगावच्या केळ्यांना जीआय मानांकन मिळाल्याचा पंतप्रधानांनी अत्यंत अभिमानाने उल्लेख केला. या कामगिरीबद्दल जळगावच्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांना अधिक सुधारणेसाठीच्या सूचना सादर करण्याचे आवाहन केले.
मध्य रेल्वे विभागाच्या किसान रेल्वेगाडीची हजारावी फेरी महाराष्ट्रातील सावदा येथून केळी घेऊन रवाना झाली. या गाडीला २३ डबे असून त्यात ४५३ टन केळ्यांची वाहतूक दिल्लीतील आदर्श नगर येथे होणार आहे. मध्य रेल्वेच्या किसान रेल्वेमार्फत आतापर्यंत ३.४५ लाख टन कृषी उत्पादनांची वाहतूक झाली आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि खासदार रक्षा खडसे यांनीही शेतकऱ्यांच्या हितासाठी रेल्वे विभागाच्या या उपक्रमांचे कौतुक केले. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्हि.के.त्रिपाठी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सर्वांचे आभार मानले.