मुंबई :
राज्यात १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद करण्याचे राज्य शासनाचे आदेश असतांना मुंबईत शिक्षणमंत्र्यांचे आदेश धुडकावत १० वी १२ वी चे वर्ग भरविले जात आहेत. शिक्षण विभागात एकवाक्यता नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली असल्याची टीका भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघून राज्यातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकांनी ऑनलाईन शिकविण्याचे आदेश आहेत, मात्र १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या व इतर कामासाठी बोलविण्याचे अधिकार शाळांना आहे, याचाच सोयीचा अर्थ लावून अनेक शाळांनी १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांचे वर्ग भरीत आहेत. अनेक शाळांनी तर पूर्व परीक्षांचे आयोजन करून कोविडच्या फैलावाला रीतसर आमंत्रण दिले आहे. काही शाळांमध्ये शिक्षकांना कोरोना संसर्ग झाल्यावर सुद्धा नेमके काय करावे? शाळेबाबत नेमके काय करावे याबाबत शिक्षण विभागाकडून स्पष्टपणे कोणतेही मार्गदर्शन मिळत नसल्याने मुख्याध्यापक त्रस्त झाले आहेत. ऑनलाईन शिक्षणाचे आदेश असूनही विनाकारण शाळेत बोलाविले जात असल्याने शिक्षक त्रस्त आहेत. याबाबत शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे