नवी दिल्ली :
महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार असलेल्या भाजपमधून विस्तव जात नसताना आता राज्यातील ११० आमदार दिल्लीत जाणार आहेत. ५ आणि ५ एप्रिलला हे आमदार दिल्लीला जाणार आहेत.
५ आणि ६ एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्र विधिमंडळाच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन लोकसभा सचिवालय आणि प्राईड संस्थेने एकत्रितरित्या केले आहे. त्यासाठी राज्यातील एकूण 110 आमदारांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. यावेळी उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम व्यंकैय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे पिठासीन अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पानिपत स्मारकाची व्यवस्था अधिक चांगली करणार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरवीरांनी महाराष्ट्राबाहेर उत्तरेतही परकीय सत्तांचा सामना करत देश रक्षणाचे कार्य केले. पानिपत येथे देश रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या या शूरांच्या स्मरणार्थ बांधलेल्या पानिपत स्मारकाची व्यवस्था अधिक चांगली होण्यासाठी स्थानिक मराठी संघटना, जिल्हाधिकारी व महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.