मुंबई :
मुंबईत सुरु करण्यात आलेल्या लसीकरण मोहीमेला लाभार्थ्यांनी चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत पात्र लाभार्थ्यांपैकी पहिली मात्रा ११० टक्के तर दुसरी मात्रा ९९ टक्के लाभार्थ्यांनी घेतल्याने ९९ टक्के मुंबईकर लसवंत झाले आहेत. त्यामुळे ३५१ लसीकरण केंद्रांपैकी १२५ लसीकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. बंद करण्यात येणाऱ्या लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळ शाळा, काॅलेज , गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या लसीकरण कॅम्पवर तैनात करण्यात येतील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनावर उपयुक्त लस उपलब्ध झाल्यानंतर मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली. मुंबई महापालिका व शासकीय अशा एकूण ३५१ लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांना लशीच्या मात्रा देण्यात आल्या. पात्र १ कोटी ६१ लाख ६, ७६२ लाभार्थ्यांना लशीची पहिली मात्रा तर पात्र ९३ लाख ३५ हजार ११४ लाभार्थ्यांना लशीची दुसरी मात्रा देण्यात आली असून पहिली मात्रा ११० टक्के तर दुसरी मात्रा ९९ टक्के पूर्ण झाल्याचे ते म्हणाले. त्यामुळे ज्या ठिकाणी लाभार्थी येत नाही, अशा ठिकाणची १२५ लसीकरण केंद्र बंद करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणची लसीकरण केंद्र बंद करण्यात येतील त्या ठिकाणचे साहित्य मनुष्यबळ हे मोबाईल व्हॅन, ज्या ठिकाणी लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत, त्या ठिकाणी वापरण्यात येईल, असे ही ते म्हणाले.