Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

रायगडमधील तळीये, केवनाळे, साखर या दरड कोसळलेल्या गावांसाठी १३.२५ कोटी

banner

मुंबई :

जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात तळीये-कोंडाळकरवाडी, बौध्दवाडी, केवनाळे आणि साखर (सुतारवाडी) या गावांमध्ये दरड कोसळून गावे उद्ध्वस्त झाली. रायगड जिल्ह्यातील या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारने १३ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

गतवर्षी २२ व २३ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे तळीये-कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी, मौजे केवनाळे आणि पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर (सुतारवाडी) या गावांमध्ये कोसळलेल्या दरडीमुळे ही गावे बाधीत झाली होती. तसेच मनुष्यहानीही झाली. दरडीमध्ये मौजे तळीये गावातील कोेंडाळकरवाडी दरडीमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. दरड कोसळलेल्या या गावातील नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी भूसंपादन, नागरी व सार्वजनिक सोयीसुविधा, विद्युत पुरवठा तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करणे या कामांसाठी राज्य सरकारकडून १३ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

महाड तालुक्यातील मौजे तळीये-कोंडाळकरवाडी व बौध्दवाडीमध्ये भूसंपादनासाठी २ कोटी ९२ लाख १७ हजार ७६१ रूपये, मौजे केवनाळेमध्ये भूसंपादनासाठी ६४ लाख २६ हजार १४८ रूपये, पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर (सुतारवाडी) साठी ३८ लाख ४१ हजार ७८६ रूपये असे एकूण भूसंपादनासाठी ३ कोटी ९४ लाख ८५ हजार ६९५ रूपये मंजूर करण्यात आले आहेत.त्याचप्रमाणे मौजे तळीये-कोंडाळकरवाडी व बौध्दवाडीमध्ये नागरी व सार्वजनिक सोयी सुविधा, विद्युत पुरवठा तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करणे या कामांसाठी ९ कोटी ३० लाख १६ हजार ५५२ रूपये निधीची तरतूद केली आहे, असे एकूण १३ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णयही ८ फेब्रुवारी २०२२ रोजी निर्गमीत करण्यात आला आहे.

तात्पुरत्या पुनर्वसनाकरिता २५ लाखांचा निधी

दरड कोसळल्याने बाधित झालेल्या या गावांच्या तात्पुरत्या पुनर्वसनाच्या प्रस्तावासही शासनाने मान्यता दिली आहे. रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांकडून प्रस्तावित केल्यानुसार कंटेनर चौथरा तयार करणे, नळ पाणी पुरवठा योजना, रस्ते व ड्रेनेज लाईन तयार करणे इत्यादी कामांसाठी ५५ लाख ५८ हजार ३८४ रूपये इतक्या निधीपैकी ५० टक्के म्हणजे २५ लाख ७९ हजार १९२ रूपये इतका निधी मंजूर केला आहे.

Related posts

न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न; मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये – मुख्यमंत्री

हे खाल्यास विविध रोगांपासून राहाल दूर!

मुंबई विद्यापीठाच्या ‘उमला’वर बीसीआयच्या मान्यतेची टांगती तलवार

Leave a Comment