मुंबई
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे दरवर्षी आयोजित राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेची मुंबई जिल्हा बाल विज्ञान परिषदेची जिल्हास्तरीय फेरी नुकतीच पार पाडली. या फेरीतून राज्यपूर्वस्तरासाठी मुंबईतील १६ प्रकल्पांची निवड झाली असून, त्यामध्ये मराठी माध्यमाच्या ६ प्रकल्पांचा समावेश आहे. अरविंद गंडभिर, चेंबूर वेल्फेअर मराठी शाळा, स्वाध्याय भवन आणि महेंद्र अकादमी या शाळांचे विज्ञान प्रकल्प यावर्षी मुंबई बालविज्ञान परिषदेत अव्वल ठरले आहेत.
मुंबई जिल्हा बाल विज्ञान परिषद यावर्षी ऑनलाईन पद्धतीने ६ केंद्रांवर झाली. परिषदेची अंतिम फेरी दहिसरमधील व्हीपीएम विद्यामंदिर येथे झाली. यावेळी ‘शाश्वत जीवनासाठी विज्ञान’ या मुख्य विषयावर आणि पर्यावरण विषयक ५ उपविषयांवर मुंबईतील विविध शाळांचे २३२ संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले. तीन कठीण टप्प्यांमध्ये २३२ विज्ञान प्रकल्पांचे परीक्षण करून राज्यपूर्वस्तरासाठी मुंबईतील १६ प्रकल्पांची निवड करण्यात आली. यातील ७ प्रकल्प पश्चिम मुंबई, ६ प्रकल्प उत्तर मुंबई आणि ३ प्रकल्प दक्षिण मुंबईतील आहेत. निवड झालेल्या प्रकल्पांमध्ये मराठी माध्यमाच्या शाळांनी चांगले यश प्राप्त केले आहे. १६ प्रकल्पांपैकी ६ प्रकल्प मराठी माध्यमाच्या शाळांचे आहेत. पुढील राज्यपूर्व स्तरासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ३०० ते ३५० प्रकल्प निवडले जाण्याची संभाव्यता आहे. पुढील फेरी जिज्ञासा ट्रस्टतर्फे ठाणे येथील सरस्वती क्रीडा संकुलात १९ डिसेंबरला होणार असून, सुमारे ७५ ते ८० प्रकल्प राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी पात्र ठरतील, अशी माहिती मुंबई विभाग प्रमुख बाळासाहेब जाधव यांनी दिली.
परिषदेच्या उदघाटन प्रसंगी डॉ. ललित शर्मा, डॉ. नरेंद्र देशमुख, सुरेंद्र दिघे, बाळासाहेब जाधव, सुधीर देसाई, विश्वास कोरडे नंदकुमार कासार, चेतना ओझा, कल्पना दवे आणि डॉ. आशा बिनुकुमार हे उपस्थित होते. ही परिषद यशस्वी करण्यासाठी मुंबई विभागाच्या कार्यकारी मंडळाचे जिल्हा समन्वयक आणि इतर सभासद यांनी अथक परिश्रम घेतले.