मुंबई
क्षयरोग नियंत्रण व प्रतिबंधासाठी मुंबई महापालिकेकडून १५ ते २५ नोव्हेंबरदरम्यान ‘स्पेशल अॅक्टिव्ह केस फायडिंग’ हे विशेष क्षयरोग तपासणी अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत २४ क्षयरोग जिल्ह्यातील ५४ युनिटमधील १७ लाख नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
क्षयरोग रुग्णांची तपासणी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून यावर्षीचे पहिले विशेष तपासणी अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये क्षयरोगाचा प्रभाव तुलनेने अधिक जाणवलेल्या ५४ टीबी युनिट परिसरांमधील साधारणपणे १७ लाख व्यक्तींची क्षयरोग तपासणी करण्यात येणार आहे. या अभियानासाठी महापालिकेचे ८७६ चमू कार्यरत राहणार असून, ते सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांची तपासणी करणार आहेत. घरातील व्यक्ती कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी बाहेर असल्यास हे चमू दिवसातील इतर वेळी देखील भेट देऊन तपासणी करणार आहेत. प्राथमिक तपासणीदरम्यान आढळणार्या संशयित रुग्णांच्या बेडक्यांची तपासणी व क्ष-किरण चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी जवळच्या सरकारी किंवा मुंबई महापालिकेच्या प्रयोगशाळेत केली जाणार आहे. तर क्ष-किरण चाचणी निर्धारित खाजगी क्ष-किरण केंद्रामध्ये केली जाणार आहे. यासाठी संशयित रुग्णाला विशेष ‘व्हाऊचर’ देण्यात येणार आहे. ज्यामुळे संशयित रुग्णाला क्ष-किरण चाचणी मोफत करुन घेता येणार आहे. या अभियानादरम्यान क्षयरोगाची बाधा आढळून आलेल्या रुग्णांना औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत. तपासणीसाठी येणार्या पथकास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले.