Voice of Eastern

मुंबई : 

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला यंदा विलंबाने सुरुवात झाली. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची वेळ आली तरी मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होती. वैद्यकीय अभ्यासक्रमाची दुसरी फेरी नुकतीच संपली. या फेरीनंतर राज्यातील १७ टक्के जागा शिल्लक राहिल्या आहेत. पहिल्या फेरीनंतर राज्यातील विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या २५ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या.

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राज्यामध्ये पहिल्या फेरीला ३७२ महाविद्यालयांमध्ये २२ हजार ४०३ इतक्या जागा होत्या. फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या पहिल्या फेरीवेळी राज्यातील सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांपैकी ७५ टक्के जागांवर प्रवेश झाले. तर २५ टक्के जागा शिल्लक राहिल्या. यामध्ये सर्वाधिक प्रवेश एमबीबीएस अभ्यासक्रमाला ८७ टक्के, बीयूएमएसला ८६ टक्के, बीएएमएसला ७९ टक्के, बीएचएमएसला ७३ तर बीडीएसला ५० टक्के प्रवेश झाले होते. तर अन्य वैद्यकीय अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या फेरीमध्ये प्रवेशासाठी अधिक चुरस रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर काही वैद्यकीय महाविद्यालयातील जागांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून मान्यता मिळाल्याने दुसर्‍या फेरीसाठी जवळपास १०० जागांची वाढ झाली. त्यानुसार दुसर्‍या फेरीसाठी ३९४ महाविद्यालयांमध्ये पाच हजारांपेक्षा अधिक जागा उपलब्ध होत्या. पहिल्या फेरीमध्ये जागा मिळूनही प्रवेश न घेतलेल्या व दुसर्‍या फेरीमध्ये जागा मिळालेल्या अशा ३ हजार १३१ विद्यार्थ्यांनी दुसर्‍या फेरीत प्रवेश घेतले. त्यामुळे दुसर्‍या फेरीनंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे ८३ टक्के प्रवेश झाले असून, १७ टक्केच जागा रिक्त राहिल्या आहेत. दुसर्‍या फेरीनंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ४ हजार ०१४ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक कमी जागा बीयूएमएस अभ्यासक्रमाच्या ६ टक्के, एमबीबीएसच्या ७ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. तर बीओटीएच ३९ टक्के, बी (पी अ‍ॅण्ड ओ) ३८ टक्के आणि बीडीएस ३५ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.

ऑल इंडिया कोट्यातील २९ टक्के जागा रिक्त

नीट प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑल इंडिया कोट्यातून प्रवेश होत असलेल्या जागांपैकी २९ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये बीएएमएसच्या २७ टक्के, बीएचएमएसच्या ३१ टक्के, बीयूएमएसच्या २९ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.

Related posts

नीतीश कुमार ११ मे रोजी मुंबईत; उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची घेणार भेट

Voice of Eastern

मॉडर्न नाईट रात्र शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Voice of Eastern

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुंबईतील गणेशोत्सवास भेट

Leave a Comment