मुंबई
ओमायक्रॉनच्या ७ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शनिवारी त्यांना घरी सोडल्यानंतर दुसर्याच दिवशी नागपूरमध्ये आणखी एक ओमायक्रॉनचा रुग्ण सापडला. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १८ वर पोहोचली आहे. हा रुग्ण ५ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेतून आला होता. रविवारी ओमायक्रॉनचा एक रुग्ण सापडला असताना दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे ओमायक्रॉनच्या बरे होणार्या रुग्णांची संख्या ९ वर पोहोचली आहे.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार दक्षिण आफ्रिकेहून ५ डिसेंबरला नागपूर विमानतळावर उतरलेला ४० वर्षीय पुरुष ओमायक्रॉन बाधित आढळलेला आहे. या रुग्णामधील ओमायक्रॉनची लक्षणे ही सौम्य स्वरूपाची असून, त्याच्यावर नागपूरमधील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वीही ११ एप्रिल २०२१ रोजी या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळीही त्याची लक्षणे ही सौम्य होती. त्यामुळे त्याला रुग्णालयात भरती करण्याची गरज भासली नव्हती. या रुग्णाने लसीची एकही मात्रा घेतलेली नाही. नागपूरमधील या रुग्णाच्या संपर्कातील ३० व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून, त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे.
नागपूरमध्ये सापडलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णामुळे राज्यातील रुग्णांची संख्या १८ वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबई ५, पिंपरी चिंचवड १०, पुणे मनपा १ कल्याण डोंबिवली १ आणि नागपूर १ यांचा समावेश आहे. यापूर्वी सापडलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांपैकी ७ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल शनिवारी निगेटिव्ह आला होता. त्यानंतर रविवारी आणखी दोन रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने बरे होणार्या रुग्णांची संख्या ९ वर पोहोचली आहे. आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असलेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.