मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना रेल्वेचा प्रवास बंद असतानाही अनेक नागरिक दोन वेळच्या जेवणासाठी निर्बंध झुगारून रेल्वेने प्रवास करत होते. यामध्ये अनेकदा रेल्वेकडून करण्यात येणार्या कारवाईमध्ये नागरिकांना पकडण्यात येत होते. गेल्या आर्थिक वर्षात विनातिकीट आणि अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणार्या फुकट्या प्रवाशांकडून २०० कोटींचा दंड मध्य रेल्वेने वसूल केला आहे.
मध्य रेल्वेने उपनगरीय, एक्स्प्रेस, मेल, प्रवासी आणि विशेष गाड्यांमध्ये विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांविरुद्ध तिकीट तपासणी मोहीम राबवली आहे. एप्रिल २०२१ ते १६ मार्च २०२२ दरम्यान दक्षता पथकाला ३३.३० लाख प्रकरणे आढळून आली. या प्रवाशांकडून रेल्वेने २००.८५ कोटींचा महसूल मिळवला आहे. मध्य रेल्वेची ही आतापर्यंतची सर्वाधिक कमाई आहे. मध्य रेल्वेकडून करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये मुंबई विभागातून सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई विभागामध्ये १२.९३ लाख अनियमित व विनातिकीट प्रकरणांमधून ६६.८४ कोटी वसूल केले. त्याखालोखाल भुसावळ विभागातून ८.१५ लाख प्रकरणांतून ५८.७५ कोटी रुपये, नागपूर विभागातून ५.०३ लाख प्रकरणांतून ३३.३२ कोटी, सोलापूर विभागातून ३.३६ लाख प्रकरणांतून १९.४२ कोटी, पुणे विभागात २.०५ लाख प्रकरणांतून १०.०५ कोटी आणि मुख्यालयाच्या तिकीट तपासणी पथकांनी १.८० लाख प्रकरणातून १२.४७ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. या कालावधीत कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल ५६ हजार ४४३ व्यक्ती आढळून आले असून, त्यांच्याकडू ८८.७८ लाखांचा दंड वसूल केला.