
मुंबई :
जे.जे. रुग्णालय १८० वा वर्धापन दिन साजरा करत असताना यशाचे विविध टप्पे पार करत आहे. त्यातच नुकतेच जे.जे. रुग्णालयातील कार्डिओव्हस्कुलर थोरॅसिक सर्जरी (सीव्हीटीएस) विभागातील डॉक्टरांच्या यशस्वी उपचारांमुळे ४५ वर्षीय व्यक्तीला नवजीवन मिळाले. पक्षाघाताचा झटका आला म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान, त्याच्या हृदयात गाठ असल्याचे आढळून आले. या गाठीमुळे त्यांच्या फुफ्फुसांवर परिणाम होऊन श्वास घेण्यास त्रास होण्याचा तसेच पुन्हा पक्षाघात होण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून त्या व्यक्तीचे प्राण वाचवले.
मालाड येथील रहिवासी वनेश पटेल (४५ वर्ष) यांना पक्षाघाताच्या उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पक्षाघातामुळे शरीराच्या डाव्यां बाजूला तीव्र अशक्तपणा आला. त्यांचा रक्तदाब जास्त राहिल्याने त्यांची २ डी इको तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये त्यांच्या हृदयाच्या उजव्या बाजूच्या कप्प्यामध्ये एक गाठ आढळून आली. वनेश यांच्यावर पक्षाघातासंदर्भांत यशस्वी उपचार झाल्यानंतर, त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांना बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचारासाठी बोलविण्यात आले. हृदयातील उजव्या बाजूच्या कप्प्यामध्ये असलेल्या गाठीची खातरजमा करण्यासाठी एमआरआय चाचणी करण्यात आली. यामध्ये हृदयात गाठ असल्याचे निश्चित झाले. त्यामुळे वनेश यांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तेथील डॉक्टरांनी गाठ गंभीर असल्याचे सांगत त्यांना पुन्हा जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला.
वनेश पुन्हा उपचारासाठी जे. जे. रुग्णालयामध्ये आल्यानंतर सीव्हीटीएस विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आणि पथक प्रमुख डॉ. सूरज नागरे यांनी वनेशची तपासणी करत त्यांना ताबडतोब शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. वनेशच्या संमतीनंतर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, अधीक्षक डॉ. संजय सुरासे आणि विभागप्रमुख डॉ. आशिष भिवापूरकर यांच्या मदतीने डॉ. सूरज नागरे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून हृदयातील गाठ काढली.
दोन टक्के रुग्णांमध्ये गाठी आढळतात.
हृदयात गाठ फक्त एक ते दोन टक्के रुग्णांमध्ये आढळते. हृदयातील ही गाठ न काढल्यास तिचे तुकडे हे मेंदू किंवा फुफ्फुसापर्यंत जाण्याची शक्यता असते. हृदयातील या गाठीमुळेच वनेश यांना पक्षाघाताच झटका आला होता. त्यामुळे ते तातडीने न काढल्यास त्यांना पुन्हा पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता होती, असे डॉ. सूरज यांनी सांगितले. वनेश यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया ही खूपच आव्हानात्मक होती. पण डॉक्टरांच्या तुकडीने ती यशस्वीरित्या पार पाडली.
रुग्णाने कृतज्ञता व्यक्त केली
हृदयातील गाठीबद्दल ऐकल्यानंतर मला काळजी वाटली. अन्य रुग्णालयांमधील डॉक्टरांनी धोका असल्याचे कारण देत शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. मात्र जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी माझ्यावर यशस्वी उपचार करून मला एक जीवदान दिले. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेतून मोफत करण्यात आल्याचे वनेश यांनी सांगितले.