शिक्षण

अकरावी प्रवेश अर्जाचा भाग २ भरण्याची विद्यार्थ्यांना आणखी एक संधी; २४ तासांची दिली मुदतवाढ

मुंबई :

इयत्ता अकरावी प्रवेशाचा भाग २ न भरलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण संचालनालयाकडून भाग २ पूर्ण करण्यासाठी उद्या दुपारी १२.३० वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्या फेरीसाठी अर्ज भरण्यासाठी २६ मे ते ५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीमध्ये ०५ जून २०२५ पर्यंत ११ लाख २९ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म पूर्ण (भाग १ व भाग २ ) भरले. तर जवळपास १ लाख ४१ हजार विद्यार्थ्यांना अर्ज पूर्ण भरणे शक्य झाले नाही. यातील भाग १ पूर्ण भरला आहे, मात्र दुसरा भाग भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ६ जून रोजी दुपारी १२:१५ ते ७ जून दुपारी १२:३० वाजेपर्यंत अर्जाचा भाग २ भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी अर्ज भाग २ दिलेल्या वेळेत लॉक करावा. अशा अशा विद्यार्थ्यांनी भाग २ भरून लॉक न केल्यास त्यांना प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट साठी व पहिल्या फेरीत प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालय देण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नसल्याचे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र यापूर्वी भाग २ लॉक केलेल्या विद्यार्थ्यांना आपले पसंती क्रम बदलण्याची सुविधा यादरम्यान मिळणार नाही.

ज्या विद्यार्थ्यांनी ५ जून २०२५ पर्यंत ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही किंवा आपला प्रवेश अर्ज भाग १ भरलेला नाही अथवा प्रवेश अर्ज अर्धवट भरला आहे व विहित मुदतीत आपला अर्जाचा भाग १ पूर्ण करू शकले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नव्याने प्रवेश अर्जाचा भाग १ व भाग २ भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी पुढील फेरीच्या वेळी आपले अर्ज वेळेत भरून लॉक करावेत. प्रत्येक फेरीपूर्वी नवीन विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भरण्याची सुविधा मिळणार आहे. यासाठी प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *