
मुंबई :
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीच्या पीसीएम गटाचा निकाल जाहीर केल्यानंतर मंगळवारी पीसीबी गटाचा निकाल जाहीर करण्यात आला. www.mahacet.org आणि www.mahacet.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये निकाल जाहीर करण्यात आला आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांपैकी महत्त्वाची परीक्षा असलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल दोन टप्प्यात जाहीर करण्यात आला. १६ जून रोजी पीसीएम या गटाचा निकाल जाहीर केल्यानंतर १७ जून रोजी दुसऱ्या टप्प्यात पीसीबी गटाचा निकाल सोमवारी रात्री १२ वाजता संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमधून पाहता येणार आहे. निकालादरम्यान संकेतस्थळ कोलमडून जाऊ नये यासाठी निकाल मध्यरात्री जाहीर करण्यात आला असल्याचे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ९ ते १७ एप्रिल २०२५ दरम्यान पीसीबी गटाची परीक्षा घेण्यात आली होती. पीसीबी गटासाठी ३ लाख १ हजार ७२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ८२ हजार ७३७ उमेदवार परीक्षेला बसले होते. एमएचटी सीईटीची परीक्षा १८१ केंद्रांवर घेण्यात आली. त्यातील १७२ केंद्रे राज्यात होती. तर नऊ केंद्र राज्याबाहेर होती. एमएचटी सीईटी २०२५ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी पीसीबी गटातील उमेदवारांसाठी १८ मे २०२५ रोजी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर आक्षेप नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. पीसीबी गटाचा निकाल हे www.mahacet.org आणि www.mahacet.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये जाहीर करण्यात आल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सांगण्यात आले.
दरम्यान एमएचटी सीईटी अभ्यासक्रमाच्या भौतिकशास्त्रक, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम गट) गटाचा निकाल रविवारी रात्री १२.१५ वाजताच्या सुमारास राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये राज्यासह देशभरातील विद्यार्थ्यांमधून २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत १९ एप्रिल ते ५ मे २०२५ दरम्यान पीसीएम गटाची परीक्षा झाली होती. पीसीएम गटासाठी ४ लाख ६४ हजार २६३ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ लाख २२ हजार ८६३ उमेदवार परीक्षेला बसले हाेते. एमएचटी सीईटी २०२५ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी पीसीएम गटासाठी २१ मे रोजी सूचनेद्वारे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर आक्षेप नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.