शिक्षण

बीबीए बीसीए, बीबीएम आणि बीएमएसची ‘अतिरिक्त’ सीईटी १९ व २० जुलै रोजी 

मुंबई :

बीबीए, बीसीए, बीबीएम आणि बीएमएस या अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या अतिरिक्त सीइटी १९ व २० जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) शुक्रवारी जाहीर करण्यात आले. या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल २५ हजार ५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

बीबीए, बीसीए, बीबीएम आणि बीएमएस या अभ्यासक्रमाला अल्प प्रतिसाद मिळाल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या अभ्यासक्रमासाठी आणखी एक प्रवेश प्रक्रिया घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य साामईक प्रवेश परीक्षा कक्षाने १२ ते २० जूनदरम्यान अर्ज नाेंदणी प्रक्रिया राबवली होती. या नोंदणी प्रक्रियेदरम्यान २५ हजार ५०० विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. या नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अतिरिक्त सीईटी १९ व २० जुलै या दिवशी घेण्यात येणाऱ्या असल्याचे सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.

बीबीए, बीसीए, बीबीएम आणि बीएमएस अभ्यासक्रमांसाठी एक लाखांहून अधिक जागा उपलब्ध असून, यंदा घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेसाठी ७२ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणीनंतर २९ व ३० एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेला राज्यभरातून ६१ हजार ६६६ विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षेला कमी प्रतिसाद मिळाल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून या अभ्यासक्रमासाठी अतिरिक्त सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात येणार आहे. अतिरिक्त सीईटीची पद्धत, अभ्यासक्रम आधीच्या परीक्षेप्रमाणेच राहणार आहे. तसेच गुणांकन पद्धत सुद्धा पर्सेंटाईल पद्धतीने असणार आहे. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना लवकरच त्यांच्या लॉगिन आयडीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांना परीक्षेची तारीख, वेळ आणि केंद्राची माहिती नमूद करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बीबीए, बीसीए, बीबीएम आणि बीएमएस या परीक्षेसंदर्भात अतिरिक्त माहितीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी mahacet.org या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन सीईटी कक्षाद्वारे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *