मुंबई :
केंद्र शासनामार्फत दिल्ली येथे भरवलेल्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातील युवक-युवतींनी ८ सुवर्ण, ४ रजत, ७ कांस्य आणि ११ उत्तेजनार्थ पदके असे ३० पदकांची कमाई केली आहे. महाराष्ट्राने स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. पुरस्कारविजेते तरुण-तरुणी आता शांघाय (चीन) येथे होणार्या जागतिक स्किल्स चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरले असून त्यांना आपले कौशल्य जागतिक स्तरावर प्रदर्शित करता येणार आहे. कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रीय स्पर्धेतील यशाबद्दल युवकांचे अभिनंदन केले.
कौशल्य विकास सोसायटीमार्फत विद्यार्थ्यांची दरवर्षी जागतिक स्किल्स चॅम्पियनशिपसाठी तयारी करुन घेतली जाते. स्पर्धेमध्ये १० सुवर्णपदकांसह एकूण ४९ पदके पटकावून ओरिसाने प्रथम क्रमांक पटकावला, तर ८ सुवर्णपदकांसह ३० पदके पटकावून महाराष्ट्राने द्वितीय स्थानावर आपले नाव कोरले. याशिवाय केरळ २४, कर्नाटक २३, तामिळनाडू २३, आंध्र प्रदेश १६, बिहार १३, राजस्थान, चंदीगड, हरयाणा आणि गुजरात यांनी प्रत्येकी ११, पंजाब ८ पदके मिळवली आहेत. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या पश्चिम प्रादेशिक स्पर्धेत ४५ पदके महाराष्ट्रातील युवक-युवतींनी पटकावली होती.
कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनीही विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविलेल्या तरुणांनी आता जिद्दीने शांघाय येथे होणार्या जागतिक स्पर्धेत यश मिळविण्याचे ध्येय ठेवावे. २०२३ मध्ये फ्रान्स येथे होणार्या स्पर्धेसाठीही आतापासूनच तयारी सुरु करावी. जागतिक स्तरावर कौशल्य क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करण्यात महाराष्ट्रातील युवक-युवती महत्वपूर्ण योगदान असेल, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.