मुंबई :
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना सकस, निर्भेळ आणि भेसळमुक्त मिठाई व अन्य अन्न पदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे राबवलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ३१ लाख ११ हजार ५१४ किमतीचा भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये खवा, मावा, मिठाई, खाद्य तेल, तुप, रवा मैदा, बेसन मसाले अशा पदार्थांमध्ये भेसळ केल्याचे आढळून आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त परिमल सिंग यांनी दिली.
हे पण वाचा : विनापरवाना अन्न व्यवसाय करणार्यांवर होणार कारवाई
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नुकतेच वांद्रे येथील कार्यालयात विभागाच्या कामाचा आढावा घेतला. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग, सर्व सह आयुक्त प्रत्यक्ष व इतर जिल्हास्तरीय अधिकारी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. या बैठकीत सिंग यांनी एफडीएच्या कामाचे सादरीकरण केले. सादरीकरणात सिंग यांनी सणासुदीच्या काळात नागरिकांना चांगले अन्न पदार्थ खायला मिळावेत यासाठी केलेल्या कारवाईत तब्बल ३१ लाख ११ हजार ५१४ किमतीचा साठा जप्त केल्याची माहिती दिली. या कारवाईमध्ये एफडीएला मिठाई, खवा, मावा, खाद्यतेल, तुप, रवा, मैदा, मसाले आणि बेसन यासारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केल्याचे आढळून आले. हे भेसळयुक्त पदार्थ जप्त करून ते नष्ट करण्यात आले तर काही नमूने हे तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्यात आल्याचेही सिंग यांनी स्पष्ट केले.
सहा महिन्यांत ४३ लाखांचे दुध व दुग्धजन्य पदार्थ जप्त
एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या काळात अन्न व औषध प्रशासनने राज्यातून दुधविक्रीवर केलेल्या कारवाईत ४ लाख ६० हजार ७९१ किमतीचा माल जप्त केला. दुग्धजन्य पदार्थाच्या कारवाईत ३९ लाख ५० हजार ३८६ किमतीचा माल जप्त केला. धाडी जप्तीत ५२६.१० लाख किमतीचा ऐवज जप्त केल्याचेही आयुक्त परिमल सिंग यांनी सांगितले.