मुंबई
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी यासह विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहेत. या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. मात्र प्रवेश प्रक्रिया सुरू असताना अद्यापपर्यंत ३८ हजार ९७३ विद्यार्थी या विविध प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे प्रवेश कसा मिळेल असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील तंत्रशिक्षण विभागातील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. या अभ्यासक्रमांसाठी राज्यातून जवळपास ६ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यामध्ये विविध राखीव वर्गातून विविध अभ्यासक्रमांसाठी राज्यातून सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन सीईटी सेलकडून विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर अर्ज भरताना विद्यार्थ्यांना पावतीच्या आधारे प्रवेश घेण्याची मुभा दिली होती. मात्र प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या मागास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र प्रमाणपत्रासाठी संबंधित कार्यालयाकडे अर्ज करूनही अद्यापपत्र अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सादर करण्यात अडचणी येत आहेत. विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३८ हजार ९७३ विद्यार्थ्यांकडे प्रमाणपत्र नसल्याने त्यांना प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव, एसटीचा संप, पोस्टाने प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज करूनही अद्यापपर्यंत त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश मिळालेल्या जवळपास १४ हजार १२० विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेशनिश्चिती करण्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. यासंदर्भात सीईटी सेल तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे मोठ्या प्रमाणात आलेल्या तक्रारींची दखल घेत या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या मागास प्रमाणपत्र सादर करण्यास दुसर्या फेरीपर्यंत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या निर्देशानुसार मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या फेरीमध्ये पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या जवळपास १४ हजार १२० विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
सीव्हीसी एनसीएल ईडब्ल्यूएस विद्यार्थी
कृषी – ४१८२ ११०२ ३४४ २७,००३
बीई/बीटेक १०२३७ २५६४ १३३९
एमबीए ५२९३ ३२३० ५०४
एम.फार्मा २८ २२५ ३७
एमसीए ८११ ६५४ १७३
ए.आर्च ० १२ १
बी.आर्च १४८ २८ १३
बीएचएमसीटी ४६ ७ १
बीई/बीटेक ५१४५ २८४९ ०
(थेट दुसर्या वर्षात प्रवेश)
एकूण २५,८९० १०,६७१ २४१२
प्रथम फेरीत त्या-त्या राखीव प्रवर्गातून गुणवत्तेनुसार जागा वाटप करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे द्वितीय फेरीतही जागा वाटप करण्यात येतील. मात्र विद्यार्थ्यांनी द्वितीय फेरी प्रवेश निश्चितीच्या अंतिम दिनांकाच्या आत मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास दोन्ही फेरीमध्ये संस्थेत प्रवेश निश्चित केलेल्या उमेदवारांचे प्रवेश रद्द करण्यात येतील. -रविंद्र जगताप,आयुक्त,सीईटी सेल