मुंबई :
मुंबई महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेबाबत मागवल्या हरकती व सुचनांमध्ये अखेरच्या दिवशी तब्बल ४५१ ने वाढ झाली. त्यामुळे पहिल्या १० दिवसांत अवघ्या १०० हरकती व सूचना आल्या असताना अखेरच्या दिवशी त्यांची संख्या ८१२ च्या घरात पोहोचली. २०१७ च्या तुलनेत यावेळी हरकती व सुचनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
मुंबई महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेचा आराखडा १ फेब्रुवारीला जाहीर झाल्यानंतर १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार मुंबईतील सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार व सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना नोंदवल्या. पहिल्या १० दिवसांत फक्त १०० हरकती व सूचना आल्या असताना अखेरच्या चार दिवसांत तब्बल ७१२ हरकती व सूचना नोंदवण्यात आल्या. विशेष म्हणजे १३ फेब्रुवारीपर्यंत ३६१ हरकती व सूचना आल्या होत्या. अखेरच्या दिवशी ४५१ हरकती व सूचना प्राप्त झाल्या असून एकूण ८१२ हरकती व सूचना आल्या आहेत. २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीवेळी प्रभाग पुनर्रचनाबाबत ६१३ हरकती व सूचना आल्या होत्या. त्या तुलनेत यावेळी १९९ हरकती व सूचना वाढल्या आहेत.
या प्रभागातून आलेल्या सर्वाधिक हरकती
पुनर्रचनेबाबतच्या सर्वाधिक हरकती व सूचना पश्चिम विभागातून ३३९ इतक्या आल्या. यामध्ये अंधेरी पूर्व प्रभागात ८५, कांदिवली ७६, बोरिवली ४६ हरकती व सूचना आल्या. तसेच पूर्व उपनगरातून २६३ हरकती व सूचना आल्या आहेत. यामध्ये कुर्ला विभागातून ६३ हरकती व सूचना आल्या. शहर भागात सर्वात कमी म्हणजे ७६ हरकती व सूचना आल्या. कुलाबा भागात एकही हरकती व सूचना आलेली नाही.
अशी होईल प्रक्रिया
हरकती व सूचनांवर १४ ते २२ फेब्रुवारीदरम्यान वर्गीकरण, छाननी होईल. तक्रारीनुसार वर्गीकरण करून २२ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत सुनावणी घेण्यात येईल. एका दिवसात ५ वार्डची सुनावणी होईल. २६ ते २ मार्चपर्यंत प्रभाग रचना अंतिम करून त्याबाबतचा अहवाल २ मार्चला पालिकेकडून राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाईल.