मुंबई :
रस्त्यालगत बेवारस स्थितीत सोडून दिलेल्या व वाहतुकीला अडथळा ठरलेल्या २ हजार ३८१ वाहनांच्या मालकांना मुंबई महापालिकेने वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून नोटिसा बजावल्या. त्यानंतर एका आठवड्याने यातील ७८२ वाहने जप्त केली. जप्त केलेली वाहने मालकांनी दंड भरून लवकरात लवकर सोडवावी, अन्यथा या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावातून मिळणारी रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात येणार आहे.
मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा सुरू झालेला संसर्गाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन वर्षांमध्ये अनेकदा कठोर निर्बंध घातल्याने अनेक कंपन्या, रोजगार, उद्योग बुडाले. कोट्यवधी लोक बेरोजगार झाल्याने त्याचा फटका वाहनधारकांनाही बसला. परिणामी मुंबई शहर व उपनगरात अनेक ठिकाणी रस्त्यालगत अनेक वाहने बेवारस अवस्थेत पडून आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा येत असल्याने पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने पालिकेने वाहतूक पोलिसांच्या मदतीने बेवारस वाहनांवर कारवाईचे पाऊल उचलले. त्यानुसार रस्त्यालगत बेवारस अवस्थेत असलेल्या २ हजार ३८१ दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांच्या मालकांना, चालकांना गेल्या आठवड्यात वाहन हटविण्यासाठी नोटिसा बजावली होती. नोटीसा बजावल्यानंतर ३७९ जणांनी तत्काळ आपली वाहने स्वतःहून हटवली. तर ७८२ बेवारस वाहने जप्त करून उचलली आहेत. उर्वरित वाहनांबाबत कार्यवाही सुरू आहे. जप्त बेवारस वाहनांचा १५ दिवसात लिलाव करण्याचे व जप्त वाहनांसाठी जागा उपलब्ध करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी पालिका सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. रस्त्यांवरील बेवारस वाहनांबाबत नागरिकांकडून पालिकेकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.