मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल तिकिट मिळण्यात सरकारने अनेक निर्बंध घातले होते. सध्या लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच लोकल ट्रेनचे तिकिट मिळत आहे. त्यामुळे विनातिकिट प्रवास करणार्यांच्या संख्येत वाढ झाली होती. या विनातिकिट प्रवास करणार्या प्रवाशांवर मागील नऊ महिन्यांत पश्चिम रेल्वेकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये तब्बल ११ लाख ७६ हजार फुकट्या प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून तब्बल ६८ कोटींचा दंड वसूल केला आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०२१दरम्यान केलेल्या तपासणीत सामानाच्या प्रकरणांसह विनातिकिट प्रवास करणार्यांची सुमारे ११ लाख ७६ हजार प्रकरणे आढळून आली. त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून ६८ कोटींची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. त्याचप्रमाणे या कालावधीत आरक्षित तिकिटांच्या हस्तांतरणाच्या आढळलेल्या ८ प्रकरणांतून १२ हजार ८५ रुपयांचा दंड वसूल केला. तसेच ४१३ भिकारी आणि ५३४ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये रेल्वेची थकबाकी म्हणून ६० हजार ५१५ रुपये दंड स्वरुपात वसूल करण्यात आले. तर ३५९ जणांवर कारवाई करून १ लाख ३३ हजार ६७० दंड वसूल केला.
रेल्वे किंवा रेल्वे परिसरात प्रवासी आढळून आल्यास किंवा थुंकण्यामुळे परिसर अस्वच्छ होतो. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांची लागण होते. त्यामुळे भारतीय रेल्वेने गतवर्षीपासून विना मास्क प्रवाशांवरही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार एप्रिल ते डिसेंबर २०२१ दरम्यान विनामास्क असलेल्या १० हजारांहून अधिक जणांवर पश्चिम रेल्वेने कारवाई करून १९ लाख ७५ हजारांचा दंड घेतला आहे.