मुंबई :
शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांसाठी काढलेल्या सोडतीत राज्यभरातील ९ हजार ८६ शाळांत असलेल्या १ लाख १ हजार ९०९ जागांपैकी पहिल्या सोडतीसाठी ९० हजार ६८८ बालकांची निवड झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १४ हजार ९५८ बालकांची निवड झाली असून, त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यात १० हजार ४२९ बालकांची निवड झाली आहे. मुंबईतील ४ हजार १९३ बालकांची निवड झाली आहे.
आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी राबविण्यात येणारी आरटीई ऑनलाईन अर्ज नोंदणीच्या प्रक्रियेला १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. ही प्रक्रिया १० मार्चला संपली, त्यावेळी ९ हजार ८८ शाळांतील १ लाख २ हजार २२ जागांसाठी राज्यभरातून २ लाख ८५ हजार ३२२ इतके अर्ज आले. त्यानंतर आरटीई प्रवेशाची ऑनलाईन सोडत ३० मार्चला पुणे येथे काढण्यात आली. बालकांना कोणत्या शाळेत प्रवेश मिळाला ही माहिती सोमवारी जाहीर करण्यात येणार होती. संकेतस्थळावर सोमवारी जाहीर झालीच नाही. मंगळवारी सायंकाळी ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या सोडतीमध्ये मुंबई व उपनगरातील २८२ शाळेमध्ये असलेल्या ५ हजार २८१ जागावर १५ हजार ०५० अर्ज आले होते. त्यापैकी ४ हजार १८३ बालकांना प्रवेश मिळाले आहेत. तर ठाणे जिल्ह्यात असलेल्या ६४८ शाळांत १२ हजार २६७ जागा आहेत. या जागांसाठी २५ हजार ४१९ अर्ज आले होते, त्यापैकी १० हजार ४२९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. प्रवेशाचे पुढील वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
- राज्यातील एकूण शाळा – ९०८६
- राज्यातील जागा – १०१९०९
- एकूण आलेले अर्ज – २८२७८३
- सोडतीत मिळालेले प्रवेश – ९०६८८
- प्रतिक्षा यादीत असलेली बालके – ६९८५९
- दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळालेले प्रवेश – २००