मुंबई :
मुंबईतील कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मास्क न वापरणार्यांची संख्या वाढू लागली आहे. मुंबईतील ६ वॉर्डांतील २४ प्रभागांमध्ये महापालिका आणि मुंबई पोलिसांनी राबवलेल्या ‘नो मास्क’ मोहिमेतून दोन वर्षात तब्बल ९१ कोटी ८७ लाख ८४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाचा बिमोड करण्यासाठी पालिकेने काही महिन्यांपासून सातत्याने विविध उपाययोजना केल्यामुळे शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरांतून कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता मास्कचा वापर करणे टाळले आहे. त्यामुळे पालिका अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. प्रत्येक प्रभागांतील पालिकेचे कर्मचारी आणि क्लिन अप मार्शल यांच्या सहाय्याने मास्क न लावणार्यांविरुद्ध २०० रुपये दंडाची आकारणी करण्यात आली. क्लिनअप मार्शल संबंधितांकडून दंड न आकारता आपले खिसे भरतात अशा तक्रारी संबंधितांनी पालिकेच्या अधिकार्यांकडे केल्यामुळे आता नवीन एजन्सी नियुक्त करण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबई पालिकेचे सर्व २४ वॉर्ड, मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेची सर्व स्थानके व त्यांची हद्द आणि मुंबई पोलिसांनी केलेली कारवाई यातून २८ मार्चपर्यंत ४६ लाख १९ हजार ७५० जणांवर कारवाई केली. त्यातून ९१ कोटी ८७ लाख ८४ हजार ७५ रुपये दंड वसूल केला असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.