मुंबई :
१४ नोव्हेंबर या ‘जागतिक मधुमेह दिना’चे औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत ८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मधुमेह जागरूकता अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत १,३३६ मधुमेह तपासणी शिबिरांचे आयोजन करून १ लाख नागरिकांची मधुमेह तपासणी केली. यामध्ये ९,२३१ नागरिक संशयित मधुमेही आढळल्याचे सार्वजनिक आरोग्य खात्याने स्पष्ट केले.
मुंबईतील नागरिकांनी मधुमेह तपासणी शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरांमध्ये ३० वर्षांवरील १,०८,६८४ व्यक्तींची मधुमेह चाचणी केली. या चाचणीमध्ये ९,२३१ मधुमेही संशयित आढळले. संशयित मधुमेहींचा पाठपुरावा करून निदान केले असता, २,४१५ जणांना मधुमेह झाल्याचे निष्पन्न झाले. याव्यतिरिक्त तपासणीत मधुमेह संशयित व्यक्तींपैकी १८८९ व्यक्तींमध्ये ‘मधुमेह पूर्वता’ आढळून आले.
..
निदान झालेल्या रुग्णांना रुग्णालयात नियमित उपचार घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. सर्व महापालिका दवाखान्यांमध्ये मधुमेह रुग्णांसाठी तपासणी, निदान, उपचार आणि आवश्यकतेनुसार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
– डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते
‘मधुमेह पूर्वता’ असणाऱ्यांमध्ये मधुमेह होण्याचे प्रमाण टाळता येईल. मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधोपचारांनी रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवल्यास मधुमेहामुळे होणार्या गुंतागुंतींचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल; असा विश्वास उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी व्यक्त केला आहे.