मुंबई :
दिवा स्थानकावरील जुनी रूटरिले इंटरलॉकिंग इमारत पाडणे तसेच अप आणि डाऊन जलद मार्गावरील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेच्या दिवा ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे दिलेल्या माहितीनुसार, ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत १२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटीवरून सकाळी ७.५५ ते सायंकाळी ७.५० या वेळेत सुटणार्या डाऊन जलद लोकल या मुलुंड, ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. तसेच सकाळी ८.३० ते रात्री ९.१२ पर्यंत कल्याणहून सुटणार्या अप जलद मार्गावरील लोकल कल्याण आणि ठाणे व मुलुंडदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादरहून सुटणार्या मेल, एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान पाचव्या मार्गावर तर मुंबईत येणार्या गाड्या सहाव्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने पोहोचतील.