Voice of Eastern

मुंबई

’क्षुधेलिया अन्न ! दयावे पाञ न विचारून !!’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे कोरोनाच्या महामारीत भुकेलेल्याना एकवेळचे जेवण देण्याचा सुरू केलेला महायज्ञ अ‍ॅड. वैभव थोरात यांनी अद्यापही कायम ठेवला आहे. नुकतेच त्यांनी ५० हजार नागरिकांना एकवेळचे जेवण देण्याचा टप्पा पूर्ण केला. आपला हा महायज्ञ कायम ठेवण्यासाठील त्यांनी बँकेतील २५ लाखांची मुदत ठेवीतील पैसे काढण्यासही मागेपुढे पाहिले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च २०२० रोजी देशात लॉकडाऊन जाहीर केला. यामुळे आभाळाच्या छताखाली रस्ते, पदपथ, झोपडपट्टीत राहणारे, हातावर पोट असलेल्या नागरिकांची एक वेळच्या जेवणाची भ्रांत झाली. अनेकांचा दोन दिवस हात आणि तोंडाचा मेळ होत नव्हता. त्यामुळे शहरातील सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला. पदपथावरील लोकांना आणि लहान मुलांना भुकेने व्याकुळ होताना पाहून वैभव यांचे मन हेलावून गेले. त्यातूनच या नागरिकांना किमान एकवेळचे जेवण देऊन त्यांची भूक भागवण्याचे वैभव यांनी ठरवले. १ मे २०२० पासून त्यांनी रस्ते, पदपथावर राहणार्‍या १०० नागरिकांना एकवेळ ताजे व गरम जेवण देऊन त्यांची भूक भागवण्यास सुरुवात केली. रात्री ८ वाजता गाडीमध्ये गरम जेवणाच्या प्लेट भरून वैभव मुंबईच्या रस्त्यांवर निघत असे. रस्त्यामध्ये दिसणार्‍या प्रत्येक गरीब, पदपथावर झोपणार्‍या व्यक्तीला ते जेवणाचे ताट देत होते. यामध्ये लहान मुले आणि वृद्धांची संख्या अधिक असायची. अनेकदा त्यांच्याकडील जेवण कमी पडायचे. त्यामुळे जेवण पुरवण्याचा हा महायज्ञ त्यांनी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. जेवण वाटपास कधी उशीर झाल्यास अनेकजण उपाशीपोटीच झोपत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी वेळेत जेवण देता यावे यासाठी चैतन्य बनसोडे, ललित पटेल, समीर चव्हाण, विराज बनसोड, हंसराज ज़ैस्वाल, विजय मिश्रा, प्रतिक बेनके, संजय शिंदे यांची मदत घेतली. कोरोनाची पहिली लाट ओसरताच अनेकांनी आपली मदत थांबवली मात्र आता दुसरी लाट आटोक्यात आली तरी वैभव यांनी त्यांचा जेवण पुरवण्याचा महायज्ञ कायम ठेवला. अन्नदानाचा महायज्ञ कायम ठेवता यावा यासाठी त्यांनी बँकेतील आपली २५ लाखांची मुदत ठेवही मोडली. वैभव यांनी नुकतेच ५० हजारपेक्षा अधिक नागरिकांना एकवेळचे जेवण पुरवण्याचा टप्पा पूर्ण केला. भुकेलेल्याला जेवण मिळाल्यानंतर त्याच्या चेहर्‍यावरील समाधान मला हे कार्य अखंडित ठेवण्याची ऊर्जा देत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत आपला हा महायज्ञ कायम राहणार असल्याचे वैभव थोरात यांनी सांगितले.

वेश्यावस्तीतही करतात अन्नदान

रस्त्यांवर उपाशीपोटी राहणार्‍यांना एकवेळचे जेवण देण्याबरोबरच लॉकडाऊनमध्ये वेश्यावस्तीतील महिलांची उपासमार होत असल्याचे समजल्यावर वैभव यांनी वेश्यावस्तीतील महिलांनाही अनेकदा एकवेळचे जेवण पुरवले आहे. भुकेलेल्या व्यक्तीला अन्नदान करावे. हे अन्नदान करताना तो कोण आहे विचारू नये, पाहू नये. यातच खरा धर्म आहे. हा संत तुकाराम महाराजांचा उपदेश वैभव यांनी आपल्या आयुष्यातही प्रत्यक्ष अवलंबला असल्याचे त्यांच्या कृतीमधून दिसून येते.

 

Related posts

हिवाळी सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक कधी जाहीर होणार; विद्यार्थ्यांचा प्रश्न

Voice of Eastern

धारावी झोपडपट्टीत आग ; ६ झोपड्या खाक

सिंधुताईंची अपूर्ण इच्छा पूर्ण होणार! 

Leave a Comment