उल्हासनगर :
शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीतील सीएस-2 प्लॅन्टमध्ये झालेल्या केमिकल टॅंकरच्या भीषण स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी सेंचुरी रेयांन कपंनी प्रशासन आणि केमिकल टँकर चालक मालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कुणाला ही अटक केलेली नाही. दरम्यान कपंनीच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १३ लाख रुपयांची आर्थिक मदत घोषित करण्यात आली आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर एक शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कपंनीत सीएस 2 या केमिकल प्लांटमध्ये टॅंकरमध्ये केमिकल भरताना टँकर चालकाने चुकीच्या पद्धतीने यंत्र हाताळल्याने स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा आणि भयानक होता की, कपंनी आणि आसपासचा परिसर हादरून गेला. या स्फोटात शैलेश यादव, राजेश श्रीवास्तव, अनंत डोंगोरेसह एक अन्य एका कामगाराचा मृत्यू झाला. तसेच सागर झालटे, अशोक शर्मा, पंडित मोरे यांच्यासह सहा जण गंभीर जखमी झाले. उल्हासनगर पोलिसांनी कपंनीचे सुरक्षा कर्मचारी रमेशलाल यादव यांच्या तक्रारीवरून सेंचुरी रेयांन कपंनी प्रशासन आणि टँकर मालक व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे तपास करीत आहेत.
कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज सेंचुरी रेयांन कपंनीला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या स्फोटात जखमी झालेल्या कामगारांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. तसेच हा स्फोट कशामुळे झाला, याला कोण जबाबदार आहेत, याबाबत कपंनी प्रशासनाला जाब विचारत शिंदे यांनी यापुढे अशी घटना होऊ नये, यासाठी कपंनीने ठोस पाऊले उचलली पाहिजे असे सांगत या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. श्रीकांत शिंदेसोबत आमदार कुमार आयलानी, शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र चौधरी, नाना बागुल, प्रदीप रामचंदानी आणि पक्षांचे नेते व कार्यकर्ते होते