Voice of Eastern

मुंबई :

पित्ताशय व मूत्रपिंडांमधून खडा काढण्यात आल्याचे ऐकण्यास मिळाले आहे, पण गुडघ्यामधील खड्यांबाबत फारसे ऐकण्यात आलेले नाही. महाराष्ट्रातील अमरावती येथील ७० वर्षीय रोजंदारीवर काम करणारे लक्ष्मीकांत मधेकर यांना गेल्या वर्षापासून उजव्या गुडघ्यामध्ये वेदना होत होत्या. मागील आठ ते दहा वर्षांपासून त्यांच्या गुडघ्याला सूज देखील येत होती. ज्यामुळे चालताना, पायर्‍या चढताना आणि बसताना-उठताना त्रास होत होता. ते गुडघेदुखीवरील उपचारासाठी आणि त्यांचा आजार बरा करण्यासाठी माहिम येथील फोर्टिस सहयोगी एसएल रहेजा हॉस्पिटलमध्ये आले. हॉस्पिटलमध्ये त्यांनी कन्सल्टण्ट ऑर्थोपेडिक्स व जॉइण्ट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. सिद्धार्थ एम. शाह यांच्याशी सल्लामसलत केली. डॉक्टरांनी काही चाचण्या करून निदान केले आणि त्यांच्यासाठी उपचाराची योजना आखली.

‘रूग्ण गुडघ्याच्या सांध्यामध्ये मल्टीपल जायण्ट सिनोवियल कोन्ड्रोमॅटोसिस या आजाराने पीडित होता. सिनोवियल कोन्ड्रोमॅटोसिस हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. प्रति एक लाख व्यक्तींमध्ये एकाला हा आजार होतो. या आजारामध्ये सामान्यत: ल्युब्रिकेटिंग फ्लुईड स्त्राव करणारे गुडघ्याच्या सांध्यामधील आतील अस्तर (सिनोवियम) कुर्चाचे नोड्यूल्स तयार करतात. हे नोड्यूल्स तुटू शकतात आणि गुडघ्याचा भाग सैल करू शकतात. या सैल भागाचा आकार गोळीइतका लहान किंवा मार्बलइतका मोठा असू शकतो. पण या रूग्णाची स्थिती काहीशी वेगळी होती. त्याला विविध जायण्ट सिनोवियल कोन्ड्रोमॅटोसिसचा त्रास होता. त्यांच्या गुडघ्यामधील विविध सैल भाग किंवा खडे आकाराने खूप मोठे होते. यामधील सर्वात मोठा खडा आकाराने १२ बाय ६ बाय ५.५ सेंटिमीटरचा होता आणि दोन तुकड्यांमध्ये काढणे गरजेचे होते. त्यामुळे डॉक्टरांनी रूग्णाच्या गुडघ्याच्या सांध्यामधून चार मोठे आणि डझनभर लहान ऑस्टिओकोन्ड्रोमस (खडे) काढले. आमच्या माहितीनुसार आतापर्यंत भारतामध्ये गुडघ्याच्या सांध्यामधून असे मोठे व अनेक खड्यांसह गुडघ्यामधील संपूर्ण अंतर्गत अस्तर काढण्याबाबत ऐकिवात नाही आणि जगामध्ये गुडघ्यामधून काढण्यात आलेला हा दुसरा सर्वात मोठा खडा आहे, असे या रूग्णावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केलेले डॉ. सिद्धार्थ शाह यांनी सांगितले. खडे काढण्यासोबत रूग्णावर टोटल नी रिप्लेसमेंट (टीकेआर) शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. ऑस्टिओअर्थिटिसमुळे त्याच्या गुडघ्याच्या सांध्यांना दुखापत झाली होती. दीर्घकाळापासून त्याच्या गुडघ्यामध्ये हे खडे राहिल्यामुळे त्याला ऑस्टिओअर्थिटिस झाला होता आणि यामुळे त्याच्या जॉइंट कुर्चाचे नुकसान झाले होते. १० मार्च २०२२ रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि रूग्ण उपचाराला उत्तम प्रतिसाद देत आहे. तो आता लवकरच चालू शकेल आणि कोणत्याही वेदना किंवा अस्वस्थतेशिवाय त्याची दैनंदिन कामे करू शकेल.

‘मला दीर्घकाळापासून गुडघेदुखीचा त्रास होता. २०१० मध्ये माझ्या पायामध्ये वेदना जाणवण्यास सुरूवात झाली. मला वाटले की माझ्या सांध्यांमध्ये भरपूर पाणी भरले आहे. ज्यामुळे सतत सूज येण्यासोबत अस्वस्थ वाटत होते. सुरूवातीला मी जवळच्या डॉक्टरांकडे गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितले की, इंजेक्शनद्वारे ते पाणी काढता येईल. पण तो उपचार फारसा कामी आला नाही. काही वर्षांनंतर मला परत वेदना होऊ लागल्या आणि त्याचा परिणाम माझ्या चालण्यावर झाला. त्यानंतर मी माहिम येथील एसएल रहेजा हॉस्पिटलमध्ये गेलो, जेथे डॉक्टरांनी मला गुडघ्याचा एमआरआय काढण्याचा सल्ला दिला आणि त्यामधून खडे असल्याचे निदान झाले. या निदानानंतर माझ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून खडे काढण्यात आल्याचे मधेकर यांनी सांगितले.

Related posts

एसएनडीटी महिला विद्यापीठात युवाकवींच्या काव्यप्रतिभेचा ‘नवंकोरं’ कार्यक्रम

चाळीसगावमधील शिवसैनिकांनी घेतली निष्ठेची शपथ

Voice of Eastern

तब्बल ४० वर्षांनंतर अलिबाग आणि उरण एकमेकांना जोडले जाणार

Leave a Comment