मुंबई :
दोन वेळच्या जेवणासाठी नोकरी, रोजगाराची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे चांगल्या नोकरीसाठी शिक्षणाची आवश्यकता असते. याची जाणीव झाल्याने आरिश खानने शिक्षणाचा निर्णय घेतला. मात्र शिक्षणासाठीही पैसे नसल्याने काय करावे असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला. ‘इच्छा असली की मार्ग सापडतो’ या उक्तीप्रमाणे मुंबई विद्यापीठातील आयडॉलचे जनसंपर्क अधिकारी विनोद मळाळे आणि सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांची भेट झाली आणि त्याच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.
मुंबई या मायानगरीत कोणीही उपाशी झोपत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे देशााच्या कानाकोपर्यातून लोक नोकरी, रोजगार, पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईमध्ये येत असतात. अशाचप्रकारे हरयाणामधून आरिश खान हा दिव्यांग तरुण रोजगाराच्या शोधात मुंबईत आला. मुंबईतील एका कपड्याच्या दुकानात त्याला फक्त ४००० रुपयांची नोकरी मिळाली. चार हजार रुपयांमध्ये स्वत:च्या दोन वेळच्या जेवणाचा खर्च भागवून गावाकडील वृद्ध आई-वडीलांना पैसे पाठवणे अशक्यच होते. काम करत असताना शिक्षणाशिवाय चांगली नोकरी मिळणे शक्य नसल्याचे आरिशच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. शिक्षणासाठीही पैसे लागतात. मात्र ‘जिद्दीला पर्याय नसतो’ या उक्तीचा प्रत्यय देत आरिशने पुढील शिक्षण कसे घेऊ शकतो आणि आपल्याला शिक्षणासाठी काही मदत मिळेल का या आशेने मुंबई विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ विभाग (आयडॉल) गाठले. तेथे त्याची भेट आयडॉलचे जनसंपर्क अधिकारी विनोद मळाळे यांच्याशी झाली. आरिशने आपली व्यथा मळाळे यांना सांगितली. शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असलेले अनेकजण नेहमी मळाळे यांच्या संपर्कात येतात. त्यावेळी मळाळे हे सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मदत उपलब्ध करून देतात. त्यानुसार मळाळे यांनी तातडीने सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांना दूरध्वनी करून त्यांच्याकडे मदतीची विचारणा केली. ‘एक हात मदतीचा…’ या वाक्याची आपल्या आयुष्यात अंमलबजावणी करणार्या अॅड. वैभव थोरात यांनीही तातडीने आरिशचे पूर्ण शुल्क भरले आणि प्रथम वर्ष कला शाखेमध्ये आरिशला प्रवेश मिळाला.