मुंबई : गणपती ही विद्येची देवता आणि शाळेत मुळाक्षरे गिरवून विद्यार्जनाचा-शिक्षणाचा ’श्रीगणेशा’ केला जातो. या अर्थाने शाळा आणि गणरायाचे एक वेगळेच नाते आहे. हे नाते ओळखून घरच्या गणेश सजावटीसाठी आपल्या शाळेतील वर्गाची हुबेहूब प्रतिकृती सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कुलच्या एका माजी विद्यार्थ्याने साकारली आहे.
सायन कोळीवाडा येथील सरदारनगर क्रमांक १ मध्ये राहणारा गौरव सावंत हा डी. एस. हायस्कुलचा माजी विद्यार्थी असून, २००३मध्ये दहावी उत्तीर्ण झाला. त्यानंतर गौरवने जे. जे. कला आणि उपयोजित कला महाविद्यालयातून आर्किटेक्चरची पदवी घेतली. यंदाच्या गणेशोत्सवात गौरवने त्याच्या घरच्या गणपतीच्या सजावटीसाठी चक्क शाळेच्या वर्गाची प्रतिकृती बनवली. शाळेच्या वर्गाची रंगसंगती, वर्गातले बाकडे, काळ्या रंगाचा फळा आणि ‘शील घडवते तेच खरे शिक्षण’ हे शाळेचे ब्रीदवाक्य यामुळे हुबेहूब शाळाच समोर असल्याचा भास त्याच्या घरी येणार्या गणेशभक्तांना आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना होत आहे. ‘शाळेतल्या माझ्या जुन्या मित्रांशी बोलताना ही कल्पना मला सुचली. थ्री-डी प्रिंटिंगने शाळेचे बाकडे बनवले. १७-१८ वर्षांपूर्वीची शाळा कशी होती, हे आठवून आठवून सगळ्या वस्तू बनवल्या. वर्गाच्या भिंतींचा रंग, वर्गातले दिवे, पंखे, खिडक्या- दरवाजे, फळा प्रत्येक गोष्टीची प्रतिकृती बनवली. ही सजावट करायला १० दिवस लागले. हे सगळे करताना खूप आनंद मिळाला.’ अशी माहिती गौरव सावंत याने दिली.
‘विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेविषयीचे प्रेम पाहून समाधान वाटते. माजी विद्यार्थी गौरव सावंतची ही गणेश सजावटीची कलाकृती बघायला शाळेतले शिक्षकही उत्सुक आहेत. शाळेवर असे प्रेम आपल्या मराठी शाळेचे विद्यार्थीच करू शकतात!’ असे मत डी. एस. हायस्कुलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.