मुंबई :
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनादरम्यान भाविकांना जेलीफिशने दंश करण्याच्या घटना मागील काही वर्षांपासून घडत आहे. गुरूवारी सायंकाळी गिरगाव चौपाटीवर गणेश विसजर्न मोठ्या उत्साहात सुरू असताना एका २० वर्षीय तरुणाला ६ वाजताच्या सुमारास जेलीफिशने दंश केला. या तरुणावर गोकुळदास तेजपाल (जी.टी.) रुग्णालयामध्ये उपचार दाखल करण्यात आले. त्याला उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर मुंबईतील बहुतांश गणेशमूर्ती विसर्जनासाठी आणल्या जातात. त्यामुळे गणरायाला निरोप देण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गिरगाव चौपाटीव गर्दी करत असतात. गुरूवारी गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर लेखराज उरोडेमल हा २० वर्षीय तरुण गणेश विसर्जनासाठी आला होता. गणेशमूर्ती विसर्जनासाठी तो समुद्रातील पाण्यात शिरला असताना त्याच्या डाव्या पायाला जेलीफिशने दंश केले. त्यामुळे त्याच्या पायाला मोठ्या प्रमाणात खाज सुटू लागली. लेखराजला जेलीफिशने दंश केल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून ६ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास जी.टी. रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या तरुणावर जी.टी. रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार करून त्याला रात्री घरी सोडले.
मुंबई येथील किनारपट्टी ही एक संरक्षित किनारपट्टी असून या किनारपट्टीला वेगवान पाण्याचा प्रवाह नाही. त्यामुळे जेलीफिशसारख्या जलचरांसाठी येथे मुबलक प्रमाणात प्लवंगसदृश खाद्य तयार होते. त्यामुळे ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबईतील समुद्राच्या किनारपट्टीवर ब्लू बटन जेलीफीश, स्टिंग रे (पाकट) प्रजातीच्या माशांचे संगोपन व संवर्धन होते. त्यामुळे मागील काही वर्षांपासून गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान जेलीफिश किंवा स्टिंग रे माशांनी दंश केल्याच्या घडना घडत आहेत.