मुंबई :
हार्बर मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलला प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याने, शनिवारपासून एसी लोकल बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेतला आहे. याशिवाय मध्य रेल्वेचा मुख्य मार्गावर १२ एसी लोकल फेऱ्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आता हार्बर मार्गावर एसी लोकलने प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.
एसी लोकलचे भाडे कपातीनंतर मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गावरील एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. मात्र हार्बर मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलचा प्रवासी संख्येत जास्त वाढ झाली नसल्याने मध्य रेल्वेला हार्बर मार्गावर एसी लोकल चालवणे जड जात होते. त्यामुळे मध्य रेल्वेने आता शनिवारपासून हार्बर मार्गावरील १६ एसी लोकल फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ एसी लोकल फेऱ्यांचा जागी सामान्य लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कल्याण, टिटवाळा आणि अंबरनाथ या स्थानकांचा दरम्यान शनिवारपासून १२ एसी लोकल फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर एसी लोकल फेऱ्यांची संख्या ४४ वरून ५६ पर्यंत जाणार आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे मुख्य मार्गावरील एसी लोकलचा प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे, तर हार्बर मार्गांवरील एसी लोकलचा प्रवाशांना मोठा झटका बसला आहे.
अशा असणार लोकल फेऱ्या
रविवार वगळता दररोज मध्य रेल्वे मार्गावरील मुख्य मार्गवर ८९४, हार्बर मार्गावर ६१४, ट्रान्स हार्बर २६२ आणि चौथा कॉरिडॉर मार्ग म्हणजे बेलापूर/नेरूळ- खारकोपर मार्गावर ४० अशा एकूण १ हजार ८१० लोकल फेऱ्या दररोज धावतील. ज्यामध्ये १ हजार ७५४ सामान्य लोकल तर ५६ एसी लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. रविवारी व नामनिर्देशित सुटीच्या दिवशी मध्य रेल्वेचा मुख्य मार्गावर वातानुकूलित सेवांची एकूण संख्या १४ असणार आहे, तर एकूण संख्या ६७३ पासून ६८७ पर्यंत वाढवण्यात येईल.