Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांना महाडमधील कांबळे गावात मिळणार तातडीने उपचार

banner

महाड : 

पोलादपूर ते लोणेरेपर्यत महामार्गावर होणार्‍या अपघातातील जखमींना तातडीने गोल्डन आवर्समध्ये उपचार मिळावेत व तालुक्यातील जनतेला इतर वैद्यकिय सेवा मिळाव्यात या उद्देशाने शौकत छागला मेमोरियल ट्रस्ट, कोकण रुरल डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाडमधील इसाने कांबळे येथील दर्दमंद कॅम्पसमध्ये शिफा क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. या क्लिनिकचे उदघाटन केईएम रुग्णालयातील न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आदिल छागला यांच्या मातोश्री यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यामुळे पोलादपूर, महाड, माणगाव तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना त्वरित मदत मिळणे शक्य होणार आहे.

मुंबई गोवा महामार्गावरून गेली अनेक वर्ष प्रवास करीत असताना या महामार्गावर होणार्‍या अपघातातील जखमींवर तातडीने उपचार होऊ न शकल्याने अनेकांना प्राण गमवावे लागत असल्याचे लक्षात आले. या परिसरात एखादे ट्रामा केअर सेंटर सुरु करावे अशी इच्छा आपल्या पिताश्रींची होती. अंजुमन दर्दमंद संस्थेच्या पुढाकाराने हे क्लिनिक सुरु होत असून, डॉ फैसल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली येथे रुग्ण सेवा दिली जाणार असल्याचे डॉ. छागला यांनी सांगितले.

महामार्गावर होणार्‍या अपघातामधील जखमींवर तातडीने प्राथमिक उपचार करण्याचे काम या क्लिनिकमध्ये केले जाईल. याखेरीज दर्दमंद स्कूलमधील विद्यार्थ्यांना अपघातग्रस्तांना मदत कशी करायची, स्वतःचे डोके शांत कसे ठेवायचे आदीचे मार्गदर्शन करण्यात येईल, असे डॉ. छागला यांनी सांगितले.

अंजुमन दर्दमंदचे अध्यक्ष मुफ्ती रफीक पुरकर यांनी अनेक वर्षापासून अपघातग्रस्त रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी संस्थेमार्फत उपचार केंद्र सुरू करावे, अशी इच्छा होती. मात्र आज शौकत छागला मेमोरियल ट्रस्ट, कोकण रुरल डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या सहकार्यामुळे आणि डॉ. फैसल देशमुख यांच्या पुढाकारामुळे हे क्लिनिक सुरु होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या आणि कोणत्याही आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी सर्व प्रथम धाव घेणार्‍या अंजुमन दर्दमंदने तालीम व तरक्की ट्रस्टने समाज सेवेचे आणखी एक पाऊल टाकले ठरले आहे.

महामार्गावर दर ५० किमीवर अशा प्रकारे अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आरोग्य केंद्र उभारण्याचा मानस असल्याचे डॉ नांदगांवकर यांनी सांगितले. अपघाताचे ठिकाण आणि हॉस्पिटल यांच्यातील अंतर कमी करण्याचे काम शिफा क्लिनिक करणार आहे. अपघातात गमवावे लागणारे जीव, येणारे अपंगत्वाचे प्रमाण कमी होणार आहे असेही ते म्हणाले. डॉ. फैसल देशमुख यांनी शिफा क्लिनिकमध्ये वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.

advt

Related posts

हॅलोऐवजी वंदे मातरम् अभियानाचा शुभारंभ सेवाग्राम येथून होणार

Voice of Eastern

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच ‘ज्युनिअर आणि सीनियर केजी’चे वर्ग – दीपक केसरकर 

Voice of Eastern

भांडुपमधील मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे तीन बाळांचा मृत्यू

Leave a Comment