मुंबई :
शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे करणे, त्यांना अन्य विद्यार्थ्यांसमोर अपमानित करून मानसिक त्रास देत असल्याच्या तक्रारींची दखल घेत शालेय शिक्षण विभागाने कांदिवली पश्चिमेकडील कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पुण्यातील उंड्री येथील युरो स्कूलला नोटीस दिली आहे. त्यामुळे शुल्कासाठी पालकांची अडवणूक करणार्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देणार्या शाळांना चांगलाच चाप बसल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून उमटत आहे.
कोविड-१९ संदर्भातील निर्बंधांमुळे यावर्षी शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात आला. कोविड मुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. या काळात शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी काही विद्यार्थ्यांना विलंब झाला. ही परिस्थिती विचारात घेऊन विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या आधार द्यावा तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले होते. विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक देणे, वर्गाबाहेर उभे करणे, मानसिक त्रास देणे, त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल अशी कृती करणार्या शाळांची गय न करता त्यांच्याविरूद्ध कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. असे असतानाही कांदिवली पश्चिमेकडील कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूल आणि पुण्याच्या उंड्री येथील युरो स्कूलमध्ये शुल्क भरले नसल्याने विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक दिली जात होती. त्यांना वर्गाबाहेर उभे केले जात असे. तसेच इतर विद्यार्थ्यांसमोर अपमानित करून मानसिक त्रास दिला जात असे. यासंदर्भातील तक्रारी शालेय शिक्षण विभागाकडे आल्याने त्याची दखल घेत कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य रेश्मा हेगडे यांच्याविरूद्ध विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला. तर, पुणे उपसंचालकांनी युरो स्कूलला भेट देऊन चौकशी केल्यानंतर त्यांना नोटीस बजावली आहे.
विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या त्रास देणार्या अथवा त्यांचे शैक्षणिक नुकसान करणार्या शैक्षणिक संस्थांची गय केली जाणार नाही.
– शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड