मुंबई :
मुस्लीम महिलांवर बोली लावणार्या बुल्ली बाईअॅपनंतर आता आणखी एक अॅप पोलिसांच्या रडारवर आले आहे. क्लब हाऊस या अॅपच्या माध्यमातून महिलांच्या थेट अवयवावरच बोली लावली जात असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने फरीदाबादमधून तिघांना अटक करून ट्रांन्झिस्ट रिमांडवर मुंबईत आणले आहे. अटक केलेले तिन्ही आरोपी हे १९ ते २१वयोगटातील चांगल्या कुटुंबातील आहेत.
जैष्णव कक्कड (२२), आकाश सुयाल उर्फ किरा एक्सडी (१९) आणि यशकुमार उर्फ यश पराशर (२२) असे अटक आरोपींची नावे आहेत. आकाशला कर्नाल आणि अन्य दोघांना फरीदाबादमधून अटक केली आहे. क्लबहाऊस अॅपच्या वेगवेगळ्या चॅट रूममध्ये महिलांविषयी घाणेरडे शब्द वापरून, महिलांच्या शरीराचे अवयवयांचे फोटो अपलोड करून त्याच्यावर बोली लावली जात असल्याची तक्रार एका महिलेने मुंबई सायबर पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला असता तांत्रिक तपासात त्यांना क्लबहाऊसचे चॅट रूम मॉडरेटर, प्रमुख वक्ता असणारे दोन आयडी सापडले. त्याच्या माध्यमातून पोलिसांनी तिघांना दोन वेगवेगळ्या राज्यातून ताब्यात घेतले. या तिघांना ट्रान्झिस्ट रिमांडवर मुंबईत आणले जात आहे. क्लब हाऊस अॅपच्या माध्यमातून बनवलेल्या दोन चॅट रूममध्ये हे तिघे महिलांच्या अवयवावर चर्चा करून त्यांच्या फोटोवर बोली लावत होते. तसेच महिलांबाबत अश्लील भाषेचा वापर करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तिघेही आरोपी सुसंस्कृत घरातील असून, ते एका विशिष्ट समाजाच्या महिलांना लक्ष करत असल्याची माहिती समोर आली आहे.