नवी दिल्ली :
२०२१-२२ वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प प्रथमच पेपरलेस स्वरूपात सादर करण्यात आला होता. संसद सदस्य (खासदार) आणि सामान्य जनतेला अर्थसंकल्प दस्तावेज सुलभरीत्या उपलब्ध व्हावा यासाठी ‘युनियन बजेट मोबाईल ॲप’ देखील सुरू करण्यात आले. १ फेब्रुवारी २०२२ रोजी संसदेत अर्थसंकल्प सादरीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ मोबाईल ॲपवर उपलब्ध होईल.
केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी २०२२ रोजी २०२२-२३ वर्षासाठी कागदरहित (पेपरलेस) स्वरूपात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पीय भाषण, वार्षिक वित्तीय विवरण (सामान्यपणे अर्थसंकल्प म्हणून ओळखले जाते), अनुदान मागण्या (DG), वित्त विधेयक इत्यादींचा समावेश असलेले १४ केंद्रीय अर्थसंकल्पीय दस्तावेज मोबाइल ॲपमध्ये उपलब्ध आहेत. मोबाइल ॲप दोन भाषांमध्ये (इंग्रजी आणि हिंदी) आहे. ते अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
हे ॲप केंद्रीय अर्थसंकल्प वेब पोर्टल (www.indiabudget.gov.in) वरून देखील डाउनलोड करता येईल. सामान्य लोकांसाठी अर्थसंकल्पीय दस्तावेज केंद्रीय बजेट वेब पोर्टल (www.indiabudget.gov.in) वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील.
लॉक-इन कर्मचाऱ्यांना मिळणार मिठाई
अर्थसंकल्पाबाबत गुप्तता राखण्यासाठी, अर्थसंकल्प तयार करण्यात सहभागी अधिकाऱ्यांना “लॉक इन” केले जाते. सध्याची महामारीची स्थिती आणि आरोग्य सुरक्षा विषयक नियम लक्षात घेऊन अर्थसंकल्प आखणीत सहभागी मुख्य कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या ठिकाणी थांबवण्यासाठी (लॉक-इन) हलवा समारंभाऐवजी मिठाई देण्यात आली. नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या बजेट प्रेसमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना थांबवण्यात येते. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच हे अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांना भेटू शकतात.