अलिबाग :
अलिबाग येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचा भूमिपूजन सोहळा २२ फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात करण्यात आला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी ऑनलाईन तसेच महसूल मंत्री, पालकमंत्री, वैद्यकिय शिक्षण मंत्री, संचालक अनेक मान्यवर यांनी सोहळ्याला उपस्थिती लावली, मात्र ज्या वैद्यकीय शिक्षकांच्या जीवावर या महाविद्यालयातील डॉक्टर घडवले जाणार आहेत, तेच ४५ शिक्षक या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. आपल्या मागण्यांसाठी ३५ दिवसांपासून आंदोलनाला बसूनही सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे वैद्यकीय शिक्षकांकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय शिक्षक ३५ दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी व न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयात त्यांचे आंदोलन सुरु आहे. पण मागण्यांसंदर्भात शासनाने आमच्याशी चर्चाही केली नाही. ज्या शिक्षकांच्या जोरावर नवी महाविद्यालये उभारली जात आहेत त्यांना शासन दरबारी व्यथा मांडायला गेल्यानंतर घृणास्पद वागणूक देऊन अपमान केला जात आहे हे अतिशय दुर्दैवी व खेदजनक असल्याचे सांगत वैद्यकीय शिक्षकांकडून संताप व्यक्त केला जात असल्याचे संघटनेचे सदस्य सचिन मुलकुटकर यांनी सांगितले.
राज्यात गोंदिया, नंदुरबार, सातारा, सिंधुदुर्ग, अलिबाग या ठिकाणी नवीन महाविद्यालये उभारली जात आहेत. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे पण नव्याने सुरु होत असलेल्या सर्व महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक हे अन्य प्रस्थापित महाविद्यालयातून प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात येत आहेत. यामुळे नव्याने सुरु होणारी महाविद्यालये ही अपुऱ्या मनुष्यबळाअभावी वैद्यकीय शिक्षण व रुग्णसेवा देण्यास अकार्यक्षम ठरत आहेत. याचा परिणाम प्रस्थापित महाविद्यालयांवर होऊन तेथील वैद्यकीय सुविधा सुद्धा खिळखिळीत होईल याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी भावना मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. समीर गोलावर यांनी व्यक्त केली.
नवीन महाविद्यालयामध्ये काम करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ मागील ४-५ वर्षांपासून उपलब्ध असून सुद्धा त्यांना सेवेमध्ये समावेश न करून शासनाचा कुठे खाजगीकरण करण्याकडे तर ओढा नाही ना अशी शंका डॉ. दिनेश धोडी यांनी व्यक्त केली
आम्ही कोणत्याही नवीन, सर्जनशील उपक्रमाच्या विरुद्ध नाही पण शासनाची इमानेइतबारे सेवा करणाऱ्या डॉक्टरांचे प्रश्न शासनाने समजून योग्य तो न्याय द्यावा एवढीच आमची मागणी आहे, अन्यथा प्रस्थापित महाविद्यालयांचा पाया खिळखिळा करून त्यावर वैद्यकीय शिक्षणाचा दिखाऊ पण कमजोर कळस चढवू नये हीच आमची मागणी आहे अशी संघटनेने आपली भूमिका व्यक्त केली.