मुंबई :
आपण शिक्षण घेतलेली संस्था अधिक सक्षम व्हावी या उद्देशाने आयआयटी मुंबईतून १९९६ मध्ये पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी संस्थेला तब्बल १७ कोटींची आर्थिक मदत केली. आयआयटी मुंबईने त्यांचा माजी विद्यार्थी दिवस रविवारी हायब्रिड स्वरुपात साजरा केला. यावेळी विविध शैक्षणिक आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यासाठी हा निधी देण्यात आला.
आयआयटी मुंबईतून १९९६ मध्ये पदवीधर झालेल्या रौप्य महोत्सवी बॅचच्या विद्यार्थ्यांनी ‘गो आयआटी बॉम्बे’ या नावाने निधी संकलन मोहिम हाती घेतली होती. यातून उभ्या राहिलेल्या १७ कोटी निधीतून संस्थेतील प्रयोगशाळा अद्ययावत करणे, तरुण प्राध्यापकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यावेळी आयआयटीचे माजी विद्यार्थी प्रमोद चौधरी यांनी उपलब्ध केलेल्या निधीतून ‘प्रमोद चौधरी ऍल्युमनी अॅलुमनी कन्टिन्युइंग एज्युकेशन सेंटर’ स्थापन केले. या केंद्राच्या माध्यमातून माजी विद्यार्थी संस्थेशी जोडले जाणार आहेत.
आयआयटी मुंबईमध्ये जागतिक स्तरावरचे अद्ययावत वसतीगृह उभारण्यासाठी या बॅचने ‘हॉस्टेल ८ कॉम्पलेक्स- प्रोजेक्ट एव्हरग्रील’ हाती घेतला आहे. यामध्ये ५० वर्षे जुन्या हॉस्टेलचे रुपांतर अत्याधुनिक हॉस्टेलमध्ये करण्यात येणार आहे. निवास व्यवस्था वाढविणार असल्याचे माजी विद्यार्थ्यांनी सांगितले. या कार्यक्रमात अरुण जोशी, किरण शेष, गिरीश नायक, अजय सेठी, झेनोबिआ ड्रायव्हर या माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीयबद्दल सन्मानित करण्यात आले. महेश वैद्य, देवेंद्र अग्रवाल, प्रवीण माला, दिव्यम गोएल, संदीप दंडाडे, अविश्मा मोट्टा, संजय भारद्वाज, उस्तव मुखर्जी आणि विद्युत दत्त यांना सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आयआयटीचे माजी विद्यार्थी आणि कॉर्पोरेट रिलेशन विभागाचे अधिष्ठाता प्रा. सुहास जोशी यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यानंतर संस्थेचे संचालक सुभाषिष चौधरी यांनी माजी विद्यार्थी संस्थेचा कसा महत्त्वाचा आधार आहे असे सांगत माजी विद्यार्थ्यांच्या योगदानाचे कौतुक केले.