Voice of Eastern
ताज्या बातम्या मोठी बातमी शिक्षण

महाविद्यालयातील ५० टक्के उपस्थितीबाबत अस्पष्टता; प्राचार्यांकडून वेठीस धरण्यात येत असल्याचा प्राध्यपकांचा आरोप

banner

मुंबई : 

कोरोना व त्याचा नवा विषाणू असलेल्या ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यातील सर्व महाविद्यालये व शैक्षणिक संस्थामधील वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या तसेच ५० टक्के उपस्थितीबाबतच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या होत्या. मात्र या सूचनांचा चुकीचा अर्थ काढून काही महाविद्यालयांमधील प्राचार्य हे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना वेठीस धरत असल्याचा आरोप प्राध्यापकांकडून करण्यात येत आहे. तसेच काही महाविद्यालयांमधील प्राचार्यांकडून रोज उपस्थित राहण्याची ताकिद दिली आहे, तर काही प्राचार्य आठवड्यातून तीन दिवस हजेरी देण्यासाठी महाविद्यालयात बोलवत आहेत. त्यामुळे ऑनलाईन वर्ग घेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे प्राध्यापकांकडून सांगण्यात आले आहे.

राज्य सरकारने १५ फेब्रुवारीपर्यंत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना ५० टक्के उपस्थिती व ऑनलाईन वर्ग घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून या सूचनांची पायमल्ली होताना दिसत आहे. मुंबई विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयातील काही प्राचार्य हे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना दररोज महाविद्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. तर काही प्राचार्यांनी आठवड्यातून तीन दिवस हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. परंतु प्राचार्यांकडून सर्व वर्गांचे वेळापत्रक हे सकाळच्या सत्रात ठेवण्यात येत असल्याने एकच प्राध्यापक असलेल्या शिक्षकाला अनेक वेळा ऑनलाईन वर्गच मिळत नाही. त्यामुळे जर तो तीन दिवस महाविद्यालयात येणार असेल व तीन दिवस सुट्टीवर असेल तर त्याला दिलेला अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे शक्य होणार नाही. तसेच मुंबईतील महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक हे उपनगरातून येतात. त्यामुळे सकाळी घाईघाईने महाविद्यालयामध्ये पोहचून ऑनलाईन वर्ग घ्यावे लागतात. अनेक महाविद्यालयांमध्ये नेटवर्कची समस्या येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यात अडचणी येत आहेत असल्याची माहिती मुंबईतील महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी दिली. त्याचप्रमाणे शिक्षक हे लोकल रेल्वेने प्रवास करावा लागतो आणि गर्दीचे प्रमाण ही लोकल रेल्वेमध्ये जास्त असते. यामुळे समूह संसर्गाचा धोका टाळून कोरोनाची चैन रोखणे शक्य होणार नसल्याचेही शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.

एकीकडे मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधील प्राचार्य मनमानीपणे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना महाविद्यालयात बोलवत असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी मात्र १५ फेब्रुवारीपर्यंत विद्यापीठ व महाविद्यालयातील अध्यापकांना घरी राहून शैक्षणिक कामकाज करण्याचे असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

Related posts

हॉररपट ‘बळी’वर चित्रपट प्रेक्षक व समीक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव

Voice of Eastern

दिव्यांग्यानी बनवलेल्या पणत्यांना मोठी मागणी

Voice of Eastern

बारावी परीक्षा केंद्रातील एका वर्गात फक्त २५ विद्यार्थी

Leave a Comment