मुंबई :
पर्यावरणीय प्रदुषण रोखण्यासाठी आणि तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मुंबई महापालिका वाहन इलेक्ट्रिक मोटार वाहनांच्या वापरास पाठिंबा देत आहे. त्यासाठी पालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये सार्वजनिक ईलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या ३० सार्वजनिक वाहनतळांपैकी १२ सार्वजनिक वाहनतळांवर सार्वजनिक ईलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मे. टाटा कंपनी आणि ओमाडा कंपनी यासारख्या खाजगी कंपन्यांना इरादापत्र देण्यात आले आहे.
ही सार्वजनिक ईलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी लागणारा संपूर्ण गुंतवणूक खर्च या सेवा पुरवणाऱ्या कंपन्या करतील. बृहन्मुंबई महानगरपालिकेने खाजगी आणि शासकीय उपक्रमांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये सार्वजनिक ईलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासंदर्भात धोरणात्मक मार्गदर्शक तत्वे यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहेत.