नवी दिल्ली :
केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी तंत्रज्ञान केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. संपूर्ण देशभरात आरोग्य आणि वैद्यकीय सेवेच्या प्रवेशाचा विस्तार करण्यात डिजिटल तंत्रज्ञानावर भर देत दोन नवीन डिजिटल योजना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत जाहीर केल्या आहेत.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात करतानाच महामारीचा प्रतिकूल आरोग्य आणि आर्थिक परिणाम सहन करावा लागला त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. दोन वर्षात आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये झपाट्याने झालेल्या सुधारणांमुळे देश आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम झाला आहे. लसीकरण मोहिमेचा वेग आणि व्याप्ती यामुळे महामारी विरुद्ध लढण्यासाठी खूप मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मला विश्वास आहे की ‘सबका प्रयास’ यामुळे आम्ही आमचा मजबूत विकासाचा प्रवास सुरू ठेवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, लसीकरण कार्यक्रमाची जलद अंमलबजावणी आणि सध्याच्या महामारीच्या लाटेला देशव्यापी लवचिक प्रतिसाद हे सर्वांसाठी स्पष्ट आहेत, असे त्यांनी नमूद केले.
आयुष्मान भारत डिजिटल अभियान
राष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंस्थेसाठी एक नवीन खुले व्यासपीठ आणले जाईल. यामध्ये सर्वसमावेशकपणे आरोग्य पुरवठादार आणि आरोग्य सुविधांच्या डिजिटल नोंदणी, प्रत्येकाची नेमकी आरोग्य ओळख, संमती आराखडा यांचा समावेश असेल आणि आरोग्य सुविधांमध्ये सार्वत्रिक प्रवेश प्रदान करेल.
राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रम
साथीच्या रोगामुळे सर्व वयोगटातील लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. दर्जेदार मानसिक आरोग्य समुपदेशन आणि काळजी सेवांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे प्रवेश मिळावा यासाठी, ‘राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रम’ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये २३ उत्कृष्ट टेली-मानसिक आरोग्य केंद्रांचे नेटवर्क समाविष्ट असेल, ज्यामध्ये NIMHANS हे नोडल केंद्र असेल. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी-बंगलोर (IIITB) तंत्रज्ञान सहाय्य प्रदान करेल, असेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.