Voice of Eastern

मुंबई :

रंगीत कपडे घालून, पाठीला दप्तर लावून रोचिराम टी.थडाणी हायस्कूल फॉर हिअरिंग हँडीकॅपचे दिव्यांग विद्यार्थी गुरुवारी उत्साहाने शाळेत आले. तब्बल दोन वर्षानंतर शाळेने पुन्हा एकदा किलबिलाट अनुभवला. काही मुले भांबावलेली, काही लाजत असलेली, मात्र बँड वाजवून, फुलाची बरसात करून, चॉकलेट देऊन शिक्षक व शाळा प्रशासनांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण आले. सजवलेल्या वर्गात विद्यार्थ्यांनी गप्पागोष्टींचा आनंद अनुभवला. थोडासा अभ्यासही झाला. या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शाळेच्या सर्व संचालक मंडळाने सर्वतोपरी तयारी केली होती.

थडाणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अपंगत्वावर मात करून, वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करून जिद्दीने दोन वर्षे ऑनलाईन अभ्यास केला.पण या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवणे जास्त परिणामकारक असते असे मत शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका भाग्यश्री वर्तक यांनी व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. पुनम सावंत म्हणाल्या, की आज शाळा जिवंत झाल्यासारखी वाटते. हे सोनेरी दिवस असेच राहू देत, कोरोनाचे संकट दूर टळू दे. या मुलांच्या आकर्षणासाठी आमच्या कलाशिक्षकांनी सेल्फी पॉईंट तयार केला. जिथे छोटा भीम व वेगवेगळ्या कार्टून्सचे कटआऊटस लावलेले आहेत अशी पुस्तीही त्यांनी जोडली. आता या मुलांचे मानसिक आरोग्य जपणे हे अतिशय महत्वाचे लक्ष आहे. शालेय मानसशास्त्रज्ञ सुप्रिया मोरे यासाठी सज्ज आहेत. पालकांच्या व सर्व शिक्षकांच्या मदतीने या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काही योजना आखल्या आहेत. जेणेकरून पुढील सर्व कालावधी हे दिव्यांग विद्यार्थी सुखाने व्यतीत करू शकतील, अशी माहिती वरिष्ठ शिक्षिका भाग्यश्री वर्तक यांनी दिली.

Related posts

तलावांमधील पाणीसाठ्यात दोन दिवसांत १० हजार दशलक्ष लिटरने वाढ

तलाठी भरती प्रक्रियेला गती द्या – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबईमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था अयोग्य : आयआयटी मुंबई

Voice of Eastern

Leave a Comment