मुंबई
साकीनाका, डोंबिवलीपाठोपाठ शनिवारी सकाळी चेंबूर येथे एका 20 वर्षीय तरुणीला शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यावेळी तिच्यासोबत असलेल्या मित्रालाही चाकूचा धाक दाखवून पळवून लावण्यात आले. पाठोपाठ होणार्या बलात्काराच्या घटनेमुळे राज्यात महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
चेंबूर वसाहत येथे राहणारी पीडित तरुणी(20) शुक्रवारी रात्री काही मित्रांसोबत मरीन ड्राईव्ह येथे फिरण्यासाठी गेली होती. शनिवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास पीडित तरुणी आणि तिचा मित्र घरी परतत असताना चेंबूर कॅम्प येथे एकाने पीडित तरुणीच्या मित्राला शस्त्राचा धाक दाखवून पळवून लावले, त्यानंतर पीडित तरुणीला शस्त्राचा धाक दाखवत एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणीच्या मित्राने चेंबूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी तक्रार दाखल करताच चेंबूर पोलिसांनी ताबडतोब पीडित मुलीला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करत बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केल्याची माहिती परिमंडळ 6 चे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली. अटक केलेल्या आरोपीचे नाव धीरज राजकुमार सिंग (24) असे असून आरोपी हा तरुणीच्या ओळखीचा असल्याचे समजते. साकीनाका पाठोपाठ चेंबूर येथे शस्त्राचा धाक दाखवून पहाटेच्या सुमारास घडलेल्या बलत्कारच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.