Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

राज्यात राबविली जाणार जंतविरोधी मोहीम, २.८ कोटी मुलांना देणार जंतनाशक गोळी

banner

मुंबई :

पोटात होत असलेल्या जंतामुळे लहान मुले व किशोरवयीन मुली व मुलांमध्ये उलट्या, अतिसार, मळमळ, पोटदुखी, भूक मंदावणे, ॲनिमियायासह कुपोषण, वाढ खुंटणे असे आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे १३ फेब्रुवारीपासून राज्यामध्ये विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेंतर्गत राज्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील जवळपास २ कोटी ८० लाख मुला-मुलींनी जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.

राज्यातील जवळपास २ कोटी ८० लाख मुलांना १३ फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळी देता यावी यासाठी आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून, वैद्यकीय अधिकारी, शिक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. या मुलांना १ लाख १० हजार ९४४ अंगणवाडी केंद्रे आणि १ लाख २७ हजार ८४९ शाळा व महाविद्यालयांमध्ये या जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहे. तसेच ज्या मुलांना १३ फेब्रुवारीला गोळी घेता येणार नाही, अशा मुलांना २० फेब्रुवारी राेजी जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बाल कल्याण विभाग यांच्या समन्वयाने हा कार्यक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडून फेब्रुवारी आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत जंतनाशक मोहीम राबविली जाते. यंदा १३ फेब्रुवारी रोजी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

वयोमानानुसार गोळीचे प्रमाण

१ ते १९ वर्ष वयोगटातील मुलांना अर्धी ते एक गोळी खायला किंवा पाण्यात विरघळून दिली जाते. त्यानुसार जंतनाशक मोहिमेमध्ये १ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना २०० मि.ग्रॅ. अल्बेंडाझोलची गोळी, २ ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते, तर ३ ते ६ वर्षे वयोगटाच्या बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी चावून खाण्यास किंवा पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते. ६ ते १९ वर्षे वयाच्या मुला-मुलींना ४०० मि.ग्रॅ. गोळी चावून खाण्यास देण्यात येते. वर्षातून दोन वेळा ही गोळी घ्यायला हवी.

मोहीमेविषयी शंका दूर करण्यासाठी टोल फ्री क्रमांक

या मोहिमेविषयी काही शंका असल्यास आरोग्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या टोल फ्री क्रमांक १०४ वर नागरिक संपर्क करू शकतात किंवा गरज भासल्यास तातडीच्या वैद्यकीय सेवेअंतर्गत कार्यरत रुग्णवाहिका सेवेच्या टोल फ्री क्रमांक १०८ वर संपर्क करुन रुग्णवाहिका मागवू शकतात.

मोफत मिळते जंतनाशक गोळी

अल्बेंडाझोल ही गोळी मोहिमेच्या दिवशी मोफत दिली जाते. तसेच आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यासोबतच अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांतही या गोळ्या मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जंतसंसर्गाच्या प्रतिबंधासाठी दिली जाणारी ही जंतनाशक गोळी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मोठ्या प्रमाणावर जंतनाशक कार्यक्रमांसाठी वापरण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे प्रमाणित करण्यात आलेली आहे.

Related posts

त्रस्त झाले टेलिव्हिजन अभिनेता अलन कपूर! का ते जाणून घ्या!

राज्यात लवकरच उंच इमारतींसाठी ‘महाराष्ट्र लिफ्ट कायदा’

Voice of Eastern

वाहन चालकाना आता लायसन्स मिळणार ऑनलाईन!

Voice of Eastern

Leave a Comment