मुंबई:
मुंबई विद्यापीठातील परीक्षा विभाग हे विद्यार्थी व महाविद्यालयांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. पण या विभागाचे जनसंपर्क अधिकारी हे प्रतिनियुक्तीच्या नावाखाली वर्षानुवर्षे आपल्या विभागाकडे दुर्लक्ष करत मंत्रालयामध्ये वर्णी लावून घेत आहेत. त्यामुळे परीक्षेशी संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयांना काहीही तक्रार असल्यास त्याचे निरसन होण्यात अडचणी येत असल्याने त्यांना खेटे घालण्याच्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी व महाविद्यालयांना परीक्षा, निकालासंदर्भातील माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी परीक्षा विभागामध्ये कायमस्वरूपी, पूर्णवेळ जनसंपर्क अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्यांकडून करण्यात येत आहे.
प्रत्येक सरकारी विभागातील अधिकारी व कर्मचारी हे अनेकदा प्रतिनियुक्तीवर मंत्रालयात रूजू होत असतात. परंतु काही अधिकारी याचा गैरफायदा घेत वर्षानुवर्षे आपल्या विभागाकडे दुर्लक्ष करतात. अशाच प्रकारे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील जनसंपर्क अधिकारी हे मागील ८ ते १० वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे या विभागाला जनसंपर्क अधिकारीच उपलब्ध नाही. त्यामुळे या विभागााचा कारभार हा दुसर्या विभागाच्या जनसंपर्क अधिकार्याकडे सोपवण्यात येत आहे. परीक्षा विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. विद्यार्थी व महाविद्यालये यांना सतत परीक्षा विभागाशी संपर्कात राहावे लागते. कायमस्वरूपी जनसंपर्क अधिकारी नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा विभागातून कधी दुसर्या विभागाच्या जनसंपर्क अधिकार्यांच्या कार्यालयाकडे फेर्या माराव्या लागतात. विद्यार्थी व महाविद्यालयांना परीक्षा विभागाशी समस्येबाबत संपर्क साधताना अडचणींचा सामना करावा लागतो. परीक्षा विभागाचे जनसंपर्क अधिकारी निवडणूक काळापुरते तीन ते चार महिन्यांसाठी विद्यापीठामध्ये हवाबदल करण्यासाठी येतात. त्यानंतर नवे सरकार स्थापन झाल्यावर पुन्हा प्रतिनियुक्तीवर जात आहेत. त्यामुळे परीक्षा विभागाच्या जनसंपर्क अधिकार्याला विद्यापीठ महत्त्वाचे वाटत नसेल तर त्यांना कायमस्वरूपी प्रतिनियुक्तीवर पाठवून त्वरित पूर्णवेळ जनसंपर्क अधिकार्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांनी कुलगुरू प्रा. सुहास पेडणकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
परीक्षा विभागामध्ये प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना कोणाला भेटायचे आहे, काय काम आहे, याची माहिती सुरक्षारक्षकांना द्यायची असते. परीक्षा विभागाचे प्रभारी जनसंपर्क अधिकार्यांची केबिनही तिसर्या मजल्यावर असल्याने विद्यार्थ्यांना वरखाली फेर्या मारण्याबरोबरच अनेक अडचणींचा सामान करावा लागतो. त्यामुळे जनसंपर्क अधिकार्यांची केबिन ही तळमजल्यावर देण्यात यावी, अशी विनंतीही अॅड. वैभव थोरात यांनी केली.