मुंबई :
सध्या गुगलच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात ऑनलाईन गंडा घालण्यात येत आहे. तुम्ही पण जर गुगलवर एखादा क्रमांक शोधून त्यावरून काही ऑर्डर करणार असाल तर सावधान, तुमची फसवणूक होऊ शकते. गुगलवर बुक स्टॉलचा क्रमांक शोधून पुस्तके ऑनलाईन मागवणार्या एका महिला डॉक्टरला लाखोंचा गंडा घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता विलेपार्ले येथील एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला अशाच प्रकारे लाखो रुपयांना फसवण्यात आले आहे.
विलेपार्ले येथे राहत असलेल्या ८० वर्षांची वृद्ध महिलेला पुण्याला साडीचे पार्सल पाठवायचे होते. त्यामुळे तिने गुगलवर ब्लू डाट कुरिअर कंपनीचा मोबाईल क्रमांक शोधला. त्या मोबाईल क्रमांकावर तिने कॉल केल्यांनतर समोरुन बोलणार्या व्यक्तीने स्वत:चे नाव अमित सांगत साडीच्या वजनानुसार पैसे आकारण्यात येतील अशी माहिती देत पार्सलचा खर्च १० हजार रुपये होईल, असे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांचा कुरियर बॉय घरी येऊन साडीचे पार्सल घेऊन जाईल, असेही त्यांना सांगितले. त्यानंतर त्याने त्यांना एक लिंक पाठवत त्या लिंकवर त्यांच्या बँकेची माहिती भरण्यास सांगितली. त्यांनी बँकेची माहिती भरण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार झाल्याचे मॅसेज त्यांना आले. त्यानंतर ६ एप्रिल ते ११ एप्रिलदरम्यान त्यांच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यावर ४ लाख ७० हजार रुपये ट्रान्स्फर करण्यात आले. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी जुहू पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अमित नावाच्या अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याचा जुहू पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी समांतर तपास करीत आहेत.