मुंबई :
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळ सेवा भरती-२०२१ अंतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीकरिता संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. या परीक्षेतील कागदपत्र पडताळणीच्या तिसर्या टप्प्यांतर्गत कनिष्ठ लिपीक, वरिष्ठ लिपिक व सहायक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी १४ ते १७ जून २०२२ या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात होणार आहे.
रेल्वे रिक्रूटमेन्ट बोर्डाच्या (RRB) १४ जून रोजीच्या परीक्षेमुळे म्हाडा संकेतस्थळावरील जाहीर सूचीतील ज्या यशस्वी उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी १४ व १५ जून २०२२ रोजी उपस्थित राहता येणार नाही, त्या उमेदवारांनी १६ व १७ जून २०२२ रोजी कागदपत्र पडताळणीसाठी रेल्वे रिक्रूटमेन्ट बोर्डाच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रासह (Hall Ticket) म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन म्हाडा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.