Voice of Eastern

महाड :

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारे महाबळेश्वर आणि वरंधा हे दोन्ही घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. गत पावसाळ्यात बाधित झालेला रस्ता यावर्षीही डेंजर झोनमध्ये असून तब्बल एक वर्षाने घाटातील दुरुस्तीच्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे. नुकतीच वरंध घाटात वाघजाई येथे दरड कोसळल्याने जिल्हाधिकारी यांनी हा घाट वाहतुकीस बंद केला आहे.

वरंधा घाट हा पुणे तर महाबळेश्वर घाट हा सातारा जिल्ह्याला जोडतो. २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत महाबळेश्वर आणि वरंधा भोर घाटामध्ये दरडी कोसळून घाट मार्ग तब्बल सहा महिने बंद होता. घाटात अनेक ठिकाणी भूस्खलन आणि भेगा पडल्याने हे दोन्ही घाट वाहतुकीस धोकादायक बनले होते. रस्त्याला पडलेल्या भेगा, आलेल्या दरडी, मातीचा भराव हटवून रस्ता तात्पुरत्या दुरुस्त केला आहे.  मात्र या पावसाळ्यात रस्त्यावर पुन्हा मातीचा भराव येण्याची शक्यता आहे.

वरंध घाटातील वाघजाई येथे आलेल्या दरडीतनंतर हा घाट १ जुलै ते ३० सप्टेंबर असा जवळपास तीन महिन्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरंध घाटामुळे महाड आणि भोरमध्ये व्यापार आणि दळणवळण सोपे झाले आहे. या मार्गावर असलेल्या माझेरी, पारमाची, सूनभाऊ, रामदास पठार पुढे भोर हद्दीतील शिलीम कुंड, राजीवडी, हिरडोशी, साळुंगण, उंबर्डेवाडी, शिरगाव या गावातील ग्रामस्थांना खरेदीसाठी बिरवाडी आणि महाडमध्ये येणे शक्य होते. भाजी विक्रेते, एस.टी बसेस, किरकोळ विक्रेते, पर्यटक याच मार्गाचा वापर करतात. घाटातील सौंदर्य देखील ऐन पावसाळ्यात पाहण्याजोगे असते. यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळते. मात्र दरवर्षी या घाटात सातत्याने दरडी कोसळत असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. वरंधपासून भोरपर्यंत डोंगर भाग असल्याने मातीचा भाग कोसळून रस्त्यावर येत आहे.

वरंध घाटात रस्त्यावर आलेल्या दरडी हटवण्यात आल्या असल्या तरी रस्त्याला लागून असलेल्या दरडी आणि माती हटवण्यात आली नाही. पाऊस सुरु झाला तरी घाटात दुरुस्ती आणि सरंक्षक भिंतीची कामे सुरू आहेत. वरंध घाटात सातत्याने कोसळत असलेल्या दरडी पाहता बांधण्यात येत असलेल्या सरंक्षक भिंती आणि गॅबियन भिंती किती तग धरतील हा एक प्रश्नच आहे.

Related posts

मुंबईमध्ये पहिल्याच दिवशी घेतला १० हजार जणांनी बूस्टर डोस

Voice of Eastern

देशात शालेय शिक्षणात महाराष्ट्र तर राज्यात सातारा जिल्ह्याची मुसंडी

शुल्कासाठी विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देणार्‍या दोन शाळांवर कारवाई

Leave a Comment