Voice of Eastern

मुंबई : 

मुंबईत बुधवारपासून कोसळणार्‍या पावसाने शनिवारी काहीशी उसंत घेतली. मात्र मुंबईत दुर्घटनांचे सत्र सुरूच होते. दिवसभरात अंधेरी येथे पाच मजली इमारतीच्या सिलिंगचा भाग कोसळून एक महिला जखमी झाली. तर, गोरेगाव (पूर्व) येथे झाड कोसळून दोन वाहन चालक जखमी झाले. तसेच, चुनाभट्टी येथे बंद अवस्थेतील चार घरांची पडझड झाली असून त्यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे समजते.

मुंबईत गेल्या काही दिवसात कुर्ला, मलबार हिल, काळबादेवी आदी ठिकाणी दरड, इमारत, घर कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. कुर्ला येथील दुर्घटनेत १९ जण मृत्युमुखी पडले तर १४ जण जखमी झाले. दोन दिवस झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या. मात्र शनिवारी सकाळपासून पावसाने काहीशी उसंत घेतली. अधूनमधून पावसाच्या सरी बरसल्या. सकाळी ८ पासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबई शहर भागात ३.८३ मिमी, पूर्व उपनगर भागात ५.३९ मिमी तर पश्चिम उपनगर भागात ४.७९ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. शहर भागात वडाळा, माटुंगा आदी भागात ११ मिमी, पूर्व उपनगर भागात गव्हाण पाडा येथे १२ मिमी तर पश्चिम उपनगर भागांत सांताक्रूझ, खार परिसरात १३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

गोरेगाव (पूर्व), दिंडोशी, शगुन-ओबेरॉय मॉल समोरील रस्त्यालगत असलेले एक झाड शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास अचानकपणे एका रिक्षा व ऍक्टिव्हा या वाहनांवर कोसळले. या घटनेत रिक्षा चालक राजू पासवान (३४) व ऍक्टिव्हा चालक शाहबाझ नदीम अन्सारी (२१) हे दोघेजण जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ नजीकच्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

अंधेरी (पूर्व), जेबी नगर, छोटा गणेश मंदिर, प्लॉट नंबर ७ येथे अमरकुंज या तळमजला अधिक पाच मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या सिलिंगचा भाग शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अचानक कोसळला . या दुर्घटनेत हरविंदर कौर चांदो (४४/ महिला) या जखमी झाल्या असून त्यांना तात्काळ नजीकच्या कूपर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, शनिवारी रात्री १२.२५ वाजताच्या सुमारास चुनाभट्टी, हिंदू स्मशानभूमी येथे बंतूर भवन येथे चार बंद घरांची पडझड झाली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस व पालिका कामगार, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ मदतकार्य करून घराचा पडलेला ढिगारा, डेब्रिज वगैरे उचलण्यात आले.

Related posts

चित्रपट सृष्टीतील तापसी पन्नूचे ‘तप’ पूर्ण

चोरांना कोंडून ठेवले म्हणून कारखान्याच्या मालकाला अटक

Voice of Eastern

मलमपट्टी न करता, प्रश्न कायमस्वरूपीमार्गी लावावा

Voice of Eastern

Leave a Comment